अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त ‘अनंतरंग’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन !

कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे कार्यक्रम !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी – कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे ‘अनंतरंग’ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन. हा कार्यक्रम मराठी भाषेच्या अभिजाततेचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.

 

 

 

भित्तिपत्रिकेचे प्रकाशन महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा आणि तिच्या जतन व संवर्धनाचा संकल्प सर्वांनी घेतला.

 

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागाचे प्रमुख डॉ. सतीश कामत यांनी केले. त्यांनी अभिजात मराठी भाषेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडत भाषेच्या अभ्यासाचे महत्व अधोरेखित केले.

 

 

 

विद्यार्थिनी कुमारी नीता धुरी हिने आपल्या मनोगतातून मराठी भाषेबद्दलची आपली प्रेमभावना व्यक्त केली. अभिजात भाषा दिनाचे औचित्य सांगताना तिने विद्यार्थ्यांनी मराठी भाषा आत्मसात करून तिचा अभिमान बाळगावा असे विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पुरंदर नारे यांनी सर्वांना मराठी अभिजात भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषेच्या जतनासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घ्यावा असे सांगत, “भाषा ही फक्त संवादाचे साधन नसून आपली ओळख आणि संस्कृतीची वाहक आहे” असेही स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. जगदीश राणे यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

 

 

 

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अनंतरंग’ भित्तिपत्रिका विद्यार्थ्यांच्या कलात्मक आणि भाषिक प्रतिभेचे उत्तम प्रतिबिंब ठरली आहे. या भित्तिपत्रिकेमुळे महाविद्यालयातील मराठी साहित्य चळवळ अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

 

कार्यक्रमाने उपस्थितांना अभिजात मराठी भाषेच्या महत्त्वाची नव्याने जाणीव करून दिली आणि भाषेच्या अभिमानाचे वातावरण निर्माण केले.