मिलाग्रीस हायस्कूलमध्ये ‘ग्रंथ दिवस’ उत्साहात साजरा

वाचाल तर वाचाल’ चा संदेश 

भव्य ग्रंथदिंडीने वेधले लक्ष

सावंतवाडी । प्रतिनिधी : वाचनाचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेत ‘ग्रंथ दिवस’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन व भव्य ग्रंथदिंडी हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील मराठी विषय विभाग प्रमुख व ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. शरयू आसोलकर यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली.

ग्रंथ प्रदर्शन व दिंडीचे उद्घाटन

कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम ग्रंथदिंडीच्या दर्शनाने आणि ग्रंथालयातील पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. सहाय्यक शिक्षिका श्रीम. अँथोनीसा फर्नांडिस यांनी यावेळी कार्यक्रमाची सविस्तर प्रस्तावना केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिंडीचे व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ग्रंथालयातून शालेय सभागृहामध्ये ही ग्रंथदिंडी आणण्यात आली, जिथे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिंडीचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांचे वैविध्यपूर्ण सादरीकरण

ग्रंथदिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या आणि साहित्यिकांच्या वेशभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधले. यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई, संत कबीर, शेक्सपियर तसेच विविध महाराष्ट्रीयन वेशभूषा अशा वैविध्यपूर्ण वेशभूषांचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी कुमारी तनया सावंत (इयत्ता दहावी) या विद्यार्थिनीने ‘ययाती’ या पुस्तकाचे समर्पक समीक्षण सादर केले. तर सातवीतील कु. प्रज्योती सावंत हिने ग्रंथ दिवसाचे महत्त्व विषद केले.

डॉ. शरयू आसोलकरांचा मौलिक संदेश

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ प्राध्यापिका डॉ. शरयू आसोलकर यांनी आपल्या भाषणात ग्रंथालय दिवसाचे महत्त्व तसेच मानवी जीवनातील पुस्तक वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले. वाचनाने माणूस प्रगल्भ होतो, यावर त्यांनी जोर दिला. “वाचाल तर वाचाल” असा मौलिक संदेश त्यांनी यावेळी दिला. आपण स्वतः याच प्रशालेची माजी विद्यार्थिनी असून, याचा सार्थ अभिमान वाटतो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. भाषणाच्या शेवटी त्यांनी पसायदानाचा शुभसंदेश दिला. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांनी आपला शुभ संदेश दिला.

भव्य ग्रंथदिंडीची मिरवणूक

या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे मिलाग्रीस प्रशालेच्यावतीने आयोजित केलेली भव्य ग्रंथदिंडी. या दिंडीची सावंतवाडी बाजारपेठेतून मोठी मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये प्रशालेचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले होते, तसेच स्काऊट गाईड पथक देखील दिंडीमध्ये सहभागी झाले होते.

मिलाग्रीस हायस्कूल मार्गे, गोडाऊन, सारस्वत बँक, आर.पी.डी. हायस्कूल समोरून कळसुलकर हायस्कूल मार्गे ही दिंडी पुन्हा मिलाग्रीस प्रशालेपर्यंत आणण्यात आली आणि येथेच तिचा समारोप झाला.

आभार प्रदर्शन व सहकार्य

प्रशालेच्या वतीने सहाय्यक शिक्षिका नेवीस सालदाना यांनी सर्व उपस्थितांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सिताराम गवस यांनी केले.

या यशस्वी कार्यक्रमासाठी प्रशालेचे ग्रंथपाल लीनेश धुरी यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच शारदा गावडे, आचल रावले, मारिया फर्नांडिस, विवेकानंद जोशी, प्रणाली रेडकर, निलागी गवंडळकर, उर्मिला मिनींजिस, दीप वारंग, गणेश डिचोलकर या शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका संध्या मुणगेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांचे विशेष सहकार्य लाभले. या भव्य आयोजनासाठी पोलीस स्टेशन सावंतवाडी यांनी देखील विशेष सहकार्य केले.