कणकवली – सध्या संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या छायेखाली असून, अशा स्थितीत भारतालाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. या संभाव्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशवासीयांनी सज्ज राहण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सौरभ बोडस यांनी केले. ते चौंडेश्वरी मंदिर सभागृहात विजयादशमी उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात जिल्हा संघचालक डॉ. अरविंद, सहकार्यवाह विनय धावले, डॉ. महेंद्र आचरेकर, तालुका कार्यवाह किशोर दाभोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
बोडस म्हणाले की, “देशाची एकता आणि अखंडतेला भेदभावाच्या माध्यमातून खतपाणी घालण्याचा प्रयत्न भारतविरोधी शक्ती करत आहेत. देशात जात, धर्म, पंथ यांच्या आधारावर फूट पाडण्याचे डाव आखले जात आहेत. अशा शक्तींना खंबीर उत्तर देण्याची वेळ आली आहे.” ते पुढे म्हणाले की, १९२५ मध्ये डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. गेल्या शंभर वर्षांत संघाने अनेक संघर्ष आणि अडचणींवर मात करत राष्ट्रनिर्मितीचे कार्य सातत्याने चालू ठेवले आहे. “संघ ही राजकीय संस्था नसली तरी त्याला राजकारण समजते,” असेही त्यांनी नमूद केले.
बोडस यांनी सांगितले की, २०१४ नंतर भारताचा जागतिक पातळीवरील प्रभाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय निर्णयप्रक्रियेत भारताचे मत महत्त्वाचे मानले जाते, ही गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. परंतु भारतविरोधी शक्ती देशात फूट पाडण्यासाठी “लव्ह जिहाद” सारख्या कटकारस्थानांमध्ये गुंतल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
“संघ ही केवळ संघटना नसून, एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समाजप्रबोधनासाठी संघामार्फत वृक्षारोपण, कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्य जागृती शिबिरे घेतली जाणार आहेत. गावोगावी हिंदू संमेलने घेऊन तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती आणि भारतीय संस्कृतीची जाणीव रुजवली जाणार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी डॉ. महेंद्र आचरेकर यांनी सांगितले की, “संघ म्हणजे निःस्वार्थ सेवा, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय संस्कृतीचे मूळ मूल्य. परंतु अजूनही अनेकांना संघाचे खरे स्वरूप माहिती नाही.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा ढवण, बबलू सावंत, संतोष कानडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानिमित्त गोसेवेविषयी माहिती, व्यक्ती निर्माण केंद्र व पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.














