श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ रोजी कार्यक्रमाचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. विजयश्री जयानंद मठकर यांच्या जयंतीनिमित्त गोव्यातील ख्यातनाम लोकसाहित्याच्या अभ्यासक श्रीमती पौर्णिमा केरकर यांचे शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात एक महत्त्वपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या व्याख्यानाचा विषय ‘कोकण व गोमंतकाच्या लोकसाहित्यातील स्त्री जीवन’ हा आहे. या विषयावर श्रीमती केरकर आपले विचार मांडणार आहेत. कोकण आणि गोवा येथील लोकसाहित्यात स्त्रियांचे जीवन, त्यांचे चित्रण, सामाजिक स्थान आणि संस्कृतीचे प्रतिबिंब याबद्दल त्यांना सखोल माहिती आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती उषा परब भूषविणार आहेत.
कै. विजयश्री जयानंद मठकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी महिला आणि मुलांसंदर्भात प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. स्त्रिया व बालकांचे आरोग्य, कायदेविषयक माहिती, विविध समस्या आणि कौटुंबिक जीवन अशा महत्त्वाच्या विषयांवर आजवर अनेक तज्ज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले आहे. ही परंपरा यंदाही कायम ठेवत, समाजात प्रबोधन करण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, कार्यवाह रमेश बोंद्रे आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी या महत्त्वपूर्ण व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी साहित्यप्रेमी, अभ्यासक आणि नागरिकांना आवाहन केले आहे.








