१५ हजाराचे नुकसान
कणकवली : तळेरे येथे अज्ञाताने मालवाहू रिक्षा जाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार रविवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी प्रमोद शंकर तळेकर (६०, रा. तळेरे) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक वृत्त, प्रमोद तळेकर यांची मालवाहू रिक्षा आहे. तळेकर यांनी रविवारी सायंकाळी ६ वा. तळेरे बसस्थानकातून आपली मालवाहू रिक्षा घराच्या अंगणात लावली.
त्यानंतर ९ वाजण्याच्या सुमारास तळेकर कुटुंबीय झोपी गेले. ११.३० वाजण्याच्या सुमारास तळेकर यांची मुलीला जागा आली असता तिने घराबाहेर पाहिले तेव्हा काही जळत असल्याचे दिसून आल्यानंतर तिने आपल्या आईला जागे केले.
प्रमोद यांच्या पत्नी यांनी प्रमोद यांच्यासह कुटुंबीयांना जागे केले तेव्हा घराबाहेर रिक्षा जळत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तात्काळ पाण्याच्या मारा करून रिक्षेला लागलेली आग विझवली. मात्र, आगीत ताडपत्री व रिक्षेच्या सोमरील भाग जळून १५ हजार रुपयांचे नुकसान झाले.
याप्रकरणी प्रमोद तळेकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.














