खासदार नारायण राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची शिफारस
भाजपा मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांचे योगदान आणि स्थानिक जनतेच्या पाठिंबामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपा महायुतीचे सरकार आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेला अपेक्षित असलेला विकास साधण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सन्मान देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन मधून सुमारे १४ कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे मंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदन ठराव घेण्यात आला आहे अशी माहिती भाजपचे मालवण शहर तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, विकास निधी आणण्याचे श्रेय हे खासदार नारायण राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे आहे. त्यांच्या शिफारस मुळेच निधी मंजूर झाल्याची माहिती मोंडकर यांनी दिली.
मालवण भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब, महिला शहराध्यक्ष सौ. अन्वेशा आचरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुशे, पंकज सादये, संचालक आबा हडकर, उपाध्यक्ष सचिन आंबेरकर, जीवन भोगावकर, ललित चव्हाण, मिलिंद झाड, श्याम झाड, रवींद्र टेंबुलकर, जिल्हा चिटणीस सेजल परब, माजी नगरसेविका पूजा करलकर, सरपंच सौ. रश्मी टेंबुलकर, राणी पराडकर यांच्यासह अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री. मोंडकर म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मालवण तालुक्यासाठी १४ कोटींपेक्षा जास्त थेट निधी प्राप्त झाला आहे. मालवण शहर आणि वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गट या गटासाठी पहिल्या टप्प्यात ४ कोटी ७० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.
मंजूर झालेल्या कामांची प्रक्रिया पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना सूचना देऊन आणि त्यांच्यामार्फत पालकमंत्र्यांनी मंजूर करण्याची होती. त्यामुळे या सर्व विकास कामांचे १०० टक्के क्रेडिट हे आमचे नेते मार्गदर्शक खासदार नारायण राणे तसेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनाच जाते. कारण ही सर्व कामे त्यांच्या सूचनेनुसारच मंजूर झाली आहेत. या कामांचे प्रस्ताव भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सुचवल्यानुसारच करण्यात आले होते.
ते म्हणाले, जिल्हा नियोजन मधून प्राप्त झालेल्या निधीमध्ये मालवण शहरासाठी पहिल्या टप्प्यात नगरोत्थानमधून दोन कोटी ६५ लाख रुपये इतका भरीव विकास निधी प्राप्त झाला आहे. यामध्ये शहराची पर्यटनाची ओळख अजून दृढ व्हावी यासाठी पर्यटन पूरक प्रवेशद्वार उभारण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शहरात रिक्षा व्यवसायाचे पर्यटनातील योगदान लक्षात घेऊन केरळ, कर्नाटकच्या धर्तीवर पर्यटन पूरक रिक्षा स्टॅन्ड बनवण्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. पर्यटन पूरक लाईट व्यवस्था अधिक सुधारण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील देऊळवाडा पूल येथे आकर्षक पद्धतीचे रेलिंग बसवण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दलित वस्तीतील नागरिकांच्या मागणीनुसार व्यायाम शाळा उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील नादुरुस्त गटार व्यवस्था आणि काही करविंग पॉईंट्स विकसित करण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. चिवला बीच विकास साठीही निधी तरतूद करण्यात आली आहे.
वायरी भूतनाथ जिल्हा परिषद गटामध्ये पर्यटन आणि मच्छीमार समाजासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यात वायरी समुद्रकिनाऱ्यावरील मोरेश्वर देवस्थानाकडे पर्यटन पूरक सुविधा निर्माण करण्यासाठी आणि मच्छीमारांसाठी जेटी बांधण्यासाठी २२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जाधव वाडी रामदास मठ रेवंडकर पानंद येथील मासळी वाहतुकीसाठी रस्ता बनवण्यास २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निशानकाठी येथे पर्यटन पूरक विकास करण्यासाठी ७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तारकर्ली बंदर जेटीवर खाडी किनारा भाग सावंतवाडी तलावासारखा विकसित करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मच्छीमारांच्या मागणीनुसार निवारा शेड उभारण्यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
केंद्रात आणि राज्यात असलेले भाजप सरकार १०० टक्के मालवणच्या नागरिकांसोबत आहे. येत्या काळात पर्यटन आणि मच्छिमार विकास क्षेत्रांमध्ये मालवणला अजून भरीव निधी मिळेल अशी अपेक्षाही श्री. मोंडकर यांनी यावेळी व्यक्त केली.











