‘इंद्रधनू’च्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत नंदिनी बिले, निहार कोळी प्रथम

संज्योती जगदाळेच्या जादुई आवाजाने बहरला ‘दांडिया नाईट विथ सेलिब्रेटी’ कार्यक्रम

पालकमंत्री नीतेश राणेंच्या विशेष सहकार्यातून बहरलेल्या नवरात्र उत्सवाची सांगता

सुदर्शन गोंधळी, मैत्री मोहिते ठरले ‘नवरात्री डान्स आयडॉल’, तर रितेश वडपकर, सिद्धी कांदळगावकर ठरले ‘स्टार ऑफ इंद्रधनू दांडिया २०२५’चे मानकरी

देवगड / प्रतिनिधी :इंद्रधनू देवगड (रजि.) आयोजित व पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष सहकार्यातून शहरातील ‘तारी कंपाऊंड’ येथे आयोजित नवरात्र उत्सव २०२५ अंतर्गत पार पडलेल्या भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील खुल्या गटात नंदिनी बिले (सावंतवाडी) यांनी, तर लहान गटात निहार नितीन कोळी (देवगड) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दरम्यान, ‘सूर नवा, ध्यास नवा’ उपविजेती संज्योती जगदाळे यांच्या सुरेल आवाजात रंगलेल्या ‘दांडिया नाईट विथ सेलिब्रेटी’ने नवरात्र उत्सवाची सांगता झाली. यावेळी सेलिब्रेटी चॉईसने ‘नवरात्री डान्स आयडॉल २०२५’ साठी पुरुष गटातून सुदर्शन गोंधळी, स्त्री गटातून मैत्री मोहिते यांची, तर ‘स्टार ऑफ इंद्रधनू दांडिया २०२५’ साठी पुरुष गटातून रितेश वडपकर, स्त्री गटातून सिद्धी कांदळगावकर या कलाकारांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

नवरात्र उत्सव सांगता समारोपप्रसंगी व्यासपीठावर इंद्रधनू देवगड संस्थेचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, सचिव प्रशांत वाडेकर, खजिनदार तुषार पाळेकर, सहसचिव उदय रुमडे, नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, भाजपचे तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, वेदा हॉलिडेजचे अनिकेत बांदिवडेकर, इंद्रधनू संस्थेचे सदस्य मिलिंद मोर्ये, राजीव पडवळ, आनंद रामाणे, यतीन कुळकर्णी, वैभव केळकर, भावेश पटेल, प्रशांत पटेल, शंकर मुणगेकर आदी उपस्थित होते. नवरात्र उत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील खुल्या गटात द्वितीय दीपराज मेस्त्री (मळई), तृतीय हार्दिक कुबल (आनंदवाडी), उत्तेजनार्थ विणा जांभळे (कुडाळ), देवेंद्र घाटे (देवगड) यांनी यश मिळविले. तर लहान गटात द्वितीय स्वराली हरम (सावंतवाडी), तृतीय स्वरित मेस्त्री (मळई), उत्तेजनार्थ आर्यन लाड (जामसंडे), आराध्य परब (देवगड) यांनी यश मिळविले. खुल्या गटातील विजेत्यांना नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, संस्थाध्यक्ष प्रसाद कुळकर्णी, योगेश चांदोस्कर, रोहित म्हापसेकर, जि. प. माजी सदस्या मनस्वी घारे यांच्या हस्ते, तर लहान गटातील विजेत्यांना नगरसेविका तन्वी चांदोस्कर, महेश घारे, भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, संस्था उपाध्यक्ष किसन सूर्यवंशी, अनिकेत बांदिवडेकर यांच्या हस्ते रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण दुर्वास सावंत व अक्षय मेस्त्री यांनी केले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्रसंचालन नुपूर लळित यांनी केले.

 

दरम्यान, सुप्रसिद्ध गायिका संज्योती जगदाळे यांच्या सुरेल आवाजात रंगलेल्या ‘दांडिया नाईट विथ सेलिब्रेटी’ने नवरात्र उत्सवाचा यादगार समारोप झाला. युवाईसह अबालवृद्धांनीही या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद लुटला. गायक विठ्ठल केळुसकर, गायिका अमृता पेडणेकर, साक्षी मांजरेकर यांच्या सुरेल आवाजाची साथ व सिंधुसंकल्प बॅण्डचा तडका या कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त करून देणारा ठरला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विश्वजीत पालव यांनी केले. यावेळी गायिका संज्योती जगदाळे यांचा सत्कार संस्थाध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. आभार संस्थेचे सचिव प्रशांत वाडेकर यांनी मानले.

 

या नवरात्र उत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून उपक्रमाचे कौतुक केले. तसेच कार्यक्रमस्थळी यावर्षी प्रथमच जर्मन हँगरची संकल्पना राबविण्यात आल्याने रात्रीच्या सुमारास पावसातही विनाव्यत्यय हा नवरात्र उत्सव रसिकांच्या गर्दीत पार पडला.