अनिल परब यांच्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध

खेड – (प्रतिनिधी)

महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केलेल्या गलिच्छ आणि वैयक्तिक आरोपांच्या निषेधार्थ आज खेड शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी “जोडे मारो आंदोलन” करून अनिल परब यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक स्तरावर आणि त्यांच्या कुटुंबावर घाणेरडे आरोप केल्याचा आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाने केला आहे. राजकारण करताना वैचारिक विरोध अपेक्षित असतो, मात्र प्रत्येक वेळी कुटुंबावर टीका करून राजकारणाला गलिच्छ वळण देण्याचा प्रकार अमान्य असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले.
कुंदन सातपुते यांनी सांगितले की, “राजकारणात विचारांची लढाई असावी, वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर हल्ले करणे हे नीच राजकारणाचे उदाहरण आहे. अनिल परब यांनी कदम कुटुंबावर केलेले आरोप हे पूर्णतः खालच्या स्तराचे असून, अशा वक्तव्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.”
या आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांसह शिवसैनिक सहभागी झाले होते. या आंदोलना दरम्यान परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.