सरन्यायाधीश भूषण गवईंवरील हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेतर्फे तीव्र निषेध

सिंधुदुर्ग: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड आणि घृणास्पद हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला.

हा हल्ला केवळ मा. गवई यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेवर नव्हे, तर देशाच्या न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला आघात असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

न्यायव्यवस्थेच्या सन्माननीय परंपरेचे प्रतीक असलेल्या अशा उच्चपदस्थ न्यायाधीशावर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. तो न्यायव्यवस्थेच्या निर्भय आणि स्वतंत्र कार्याला बाधा निर्माण करणारा असल्याचे मत संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

या निषेधप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर, महिला उपाध्यक्ष ॲड. नीलिमा गावडे, सचिव ॲड. यतिश खानोलकर यांच्यासह अनेक प्रमुख सदस्य उपस्थित होते. जिल्हा सरकारी वकील ॲड. संदीप राणे, ॲड. सौ. उल्का पावसकर, ॲड. गौरव पडते तसेच ॲड. श्री. अमोल सामंत, ॲड. नीता कविटकर, ॲड. श्री. बालाजी रणशूर, ॲड. श्री. अमोल कविटकर, ॲड. शाम सावंत, ॲड. शाम गोडकर, ॲड. श्री. अजित भणगे आणि अन्य बहुसंख्य वकील बंधु-भगिनींनी एकत्र येत या हल्ल्याचा एकमुखाने निषेध केला.

*दोषींवर कठोर कारवाईची मागणी*

वकील संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध करत, दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच, मा. न्यायमूर्ती तसेच इतर न्यायाधीशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शासन व पोलीस प्रशासनाकडे विनंती करण्यात आली आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत.

न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा आधारस्तंभ असून, तिच्यावरील कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, या भूमिकेवर सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे स्पष्ट केले.