सिंधुदुर्ग जिल्हा एस. आर. दळवी फाऊंडेशन अध्यक्षपदी चेतन बोडेकर 

सिंधुदुर्ग टीचर फोरम ची कार्यकारिणी जाहीर

वैभववाडी l प्रतिनिधी :     एस. आर. दळवी (I) फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी चेतन बोडेकर यांची निवड करण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक श्री. रामचंद्र दळवी आणि सौ. सीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्याध्यक्ष श्री. महेश सावंत यांच्या प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

कार्यकारणी पुढीलप्रमाणे – अध्यक् चेतन बोडेकर, उपाध्यक्ष श्री. विजय गावडे व उपाध्यक्ष श्री. हृदयनाथ गावडे, प्रमुख सल्लागार श्री. सचिन मदने, फाऊंडेशन सल्लागार हेमंत राणे आणि श्रीमती.अस्मि जोईल, जिल्हा सचिवपदी श्री.अमर वाघमारे तर सहसचिवपदी श्री. प्रसाद गावडे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. एस. आर. दळवी फाऊंडेशन या संस्थेमार्फत सर्वांचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत.

संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन अध्यक्ष चेतन बोडेकर यानी संस्थेविषयी माहिती देताना सांगितले की, एस. आर. दळवी (I) फाऊंडेशन ही संस्था शिक्षक सक्षमीकरण व पर्यावरण संवर्धन हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारा कोणीही व्यक्ती मग तो प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक किंवा उच्च शिक्षण या कोणत्याही गटातील असला तरी तो संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतो. ही संस्था कोणत्याही प्रकारची शिक्षक संघटना नसून शिक्षकाचा व्यावसायिक विकास व्हावा, त्यांना शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, शिक्षकांमधील सुप्त कलागुणांचे प्रकटीकरण व्हावे, म्हणून विविध स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध उपक्रम राबविणारी आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करणारी ही संस्था आहे. संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन संस्थेला सहकार्य करावे, अशी आशा नूतन जिल्हाध्यक्ष चेतन बोडेकर यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील शिक्षकांचा शोध घेऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा जगभर प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाणार असल्याचेही बोडेकर सरांनी यांनी यावेळी सांगितले.