स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर
महावितरण व आरोग्य संदर्भातील अनेक प्रश्न मार्गी
सावंतवाडी । प्रतिनिधी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय हा वरिष्ठ घेतील. शिवसेना पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेले पक्ष संघटना वाढविण्याचे काम करीत आहोत. जिल्ह्यात पक्षाला चांगले वातावरण आहे. विकासाच्या मुद्द्यावर अनेक जण शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत त्यामुळे भविष्यात पक्षप्रवेशाचा हा सिलसिला सुरू राहील, असा विश्वास कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.
मुंबई येथील दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली हे आज आमदार निलेश राणे यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले. सावंतवाडी येथे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह शिवसैनिकांनी आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत केले. या स्वागत सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, माजी आमदार राजन तेली, महिला जिल्हा आघाडी प्रमुख ॲड. निता सावंत कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडीस आदी उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे पुढे म्हणाले, राजकारणात कोणीच कोणाचे कायमस्वरूपी विरोधक नसतात. वेगवेगळ्या पक्षात काम करत असताना वैचारिक विरोध असतो मात्र वैयक्तिक विरोध नसतो. त्यामुळे त्या त्या पक्षाचे काम करीत असताना कितीही संबंध ताणले तरीही नाती कायम राखली.
आज शिवसेना म्हणून सर्वजण एकत्र आले आहेत आणि हे कुटुंब आहे हे असंच राहू द्यावे आणि आपला पक्ष वाढत राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेले कार्य पाहून अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित झाले. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात आज शिवसेनेतच मोठे प्रवेश होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सर्वसामान्य जनतेतून आधार म्हणून शिवसेनेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक जण शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक असून आगामी काळात त्यांचे देखील प्रवेश होतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार दीपक केसरकर हे आमचे वरिष्ठ नेते असून त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा जास्तीत जास्त फायदा जिल्ह्याला होण्यासाठी त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असणे आवश्यक आहे. याबाबत वरिष्ठ निश्चितच विचार करतील, असा विश्वास आहे त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करताना आपण कोणतीही अट ठेवलेली नाही. मला शिवसेनेत एकत्र राहून सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला भरभरून यश मिळवून देण्यासाठी काम करायचे आहे. संघटना बांधणीवरच माझा लक्ष राहणार असून पक्षात कोणत्याही प्रकारचा माझा इगो असणार नाही. आगामी काळात जिल्ह्यातील उबाठा गटातील अनेक जणांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पाहायला मिळेल, असे तेली यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानसभेतील लक्षवेधी बाबत विचारलं असता ते म्हणाले, महावितरण खात मुख्यमंत्र्यांकडे आहे. अलिकडेच राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह कोकणातील आमदारांची बैठक झाली. समस्यांबाबत आम्ही लक्ष वेधल असून खात्याचे सचिव आमच्या संपर्कात आहेत. समस्यांचे वर्गीकरण करून कामाला प्रारंभ झाला आहे. अनेक काम सुरु आहेत. तर आरोग्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उर्वरीत बांधकाम सुरू झालं आहे. काही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वाढवीले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या बाजूला ‘डीन’च्या दर्जाचा अधिकारी नेमण्यात आला आहे.
तेथील व्यवस्थापन चांगलं होत आहे. त्यामुळे आगामी काळात उर्वरित सगळी काम मार्गी लागतील, असा विश्वास आम. निलेश राणे यांनी व्यक्त केला.
चौकट
तेलींची बँकेबाबतची ती प्रतिक्रिया प्रवेशा आधीची : आ. निलेश राणे
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या बाबतची राजन तेली यांनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या आधीची आहे. ते त्यांचे त्यावेळचे वैयक्तिक मत आहे. आता ते महायुतीत आहेत त्यामुळे तो विषय आता तिथेच संपला, असेही आ. निलेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
चौकट –
सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात काम करीत आहे. त्या बँकेवर मी देखील अध्यक्ष राहिलो आहे. त्यामुळे बँकेबाबत मला आदर असून ही बँक टिकावी ही माझी इच्छा आहे. त्यासाठीच मला ज्या त्रुटी दिसून आल्या त्याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे तेच त्याबाबत निर्णय घेतील, असे राजन तेली पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.












