आय.सी.एस. महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा

खेड (प्रतिनिधी) – खेड शहरातील सहजीवन शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग आणि ग्रंथालय शास्त्र विभागाच्या वतीने ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण करणे आणि भाषेचे ज्ञान अधिक व्यापक करणे हा होता.
या सप्ताहाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे मराठी भाषेविषयीचे ज्ञान अद्ययावत राहावे यासाठी मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या प्रश्नमंजुषेत विद्यार्थ्यांना मराठी भाषा, साहित्य, व्याकरण आणि अभिजात वारशाविषयी प्रश्न विचारण्यात आले. स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. या सप्ताहाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून करण्यात आली. मराठी विभागाच्या प्रा. मेघना कांबळे यांनी प्रास्ताविकातून अभिजात मराठी भाषेविषयी सविस्तर माहिती देत कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. यावेळी महाविद्यालयाचे अधीक्षक श्री. डी. एम. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आणि अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्र. प्राचार्य डॉ. आर. एस. भालेराव यांनी मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती आपली संस्कृती आणि ओळख आहे असे सांगून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले. ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी मराठी साहित्यातील संत, पंत आणि तंत साहित्याचे योगदान थोडक्यात सांगून मराठी भाषेची समृद्ध परंपरा अधोरेखित केली तसेच सर्व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दलची जाण आणि जिव्हाळा अधिक दृढ झाला.