हरकती दाखल करण्यासाठी जादाची मुदत मिळावी देवगड जामसंडे वाशी यांची मागणी

नगरपंचायत प्रारूप आराखड्याची माहिती घेण्यासाठी सभा

देवगड / प्रतिनिधी

शहराच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात जनतेला माहिती देण्यासाठी देवगड-जामसंडे नगरपंचायतीतर्फे शुक्रवारी दुपारी इंद्रप्रस्थ हॉल येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत ग्रामस्थांनी प्रारूप विकास आराखड्याला पुन्हा विरोध दर्शवून तो रद्द करण्याची एकमुखी मागणी केली.

यावेळी नगररचना अधिकारी नाजनीन मोमीन आणि प्रभारी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी ग्रामस्थांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याचा तसेच आराखडा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अखेर, ग्रामस्थांनी प्रारूप विकास आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी एक महिन्याच्या वाढीव कालावधीची मागणी केली.

यावर नगररचना अधिकारी श्रीमती मोमीन म्हणाल्या की, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या सोमवारपर्यंत वाढीव कालावधीबाबतचा निर्णय घेतला जाईल. तसेच जनतेला आराखडा समजून सांगण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात नगररचना विभागाकडून एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

व्यासपीठावर नगररचना सहाय्यक जीवन सरडे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला नगररचना अधिकारी श्रीमती मोमीन यांनी ग्रामस्थांना शहराच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, “हा आराखडा अंतिम नसून ही पहिली पायरी आहे. हा आराखडा अद्याप मंजूर झालेला नाही. या आराखड्यावर ग्रामस्थांनी हरकती व सूचना नगरपंचायत कार्यालयात नोंदवायच्या आहेत. या हरकतींवर तज्ज्ञ समितीच्यावतीने सुनावणी घेण्यात येईल. समितीच्या अहवालानंतर आवश्यक फेरबदल करून नवीन आराखडा पुन्हा जनतेसमोर ठेवण्यात येईल.”

प्रसाद मोंडकर म्हणाले, “हा आराखडा सदोष असून या आराखड्याचे फायदे व तोटे काय आहेत, आरक्षित जमिनींसाठी निकष कोणते आहेत, हे जनतेला समजून सांगावे.”
संजय बांदेकर यांनी विचारले, “आराखड्यासाठी सर्वेक्षण कधी करण्यात आले?”

यावर श्रीमती मोमीन म्हणाल्या, “आराखड्याला केवळ विरोध करून उपयोग नाही. जनतेने हा आराखडा समजून घ्यावा. आज हा आराखडा रद्द झाला, तरी तो पुढील काळात होणारच आहे. पुढील २० वर्षांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. वाढत्या शहरीकरणात आपल्या शहराचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा आहे. आतापर्यंत नगरपंचायत कार्यालयात ३५ हरकती प्राप्त झाल्या असून उपस्थित जनसमुदाय लक्षात घेता हरकतींची संख्या वाढली पाहिजे. हरकतींवर योग्य निर्णय तज्ज्ञ समितीमार्फत घेतले जातील. जमीन-जागांवरील आरक्षणे म्हणजे शासनाचा मालकी हक्क नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आराखडा नीट समजून घ्यावा आणि आपल्या हरकती नोंदवाव्यात.”

शिवाजी कांदळगावकर म्हणाले, “हा आराखडा जनतेला विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आला आहे. या आराखड्याबाबत जनजागृती करण्यात नगरपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे हा आराखडा रद्द करावा.”

आनंदवाडी गावातील आरक्षणांमध्ये मंदिर व वस्त्यांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आणून संजय बांदेकर म्हणाले, “तेथील मच्छीमारांनी उदरनिर्वाह करायचा कसा? घेतलेल्या हरकती तज्ज्ञ समितीमार्फत फेटाळल्या गेल्या तर पुढे आम्ही काय करायचे?”

विजय कदम म्हणाले, “हा आराखडा सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. सरकारी जमिनींचा समावेश आरक्षणात नाही. शासनाच्या अनेक जमिनी पड स्वरूपात आहेत. त्यामुळे हा आराखडा रद्द करून नव्याने आराखडा तयार करण्यात यावा.”

रिमा आचरेकर यांनी सभेत भूमिअभिलेखचे अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “भूमिअभिलेख कार्यालयात आम्हाला वेळेत नकाशा मिळत नाही, पण आराखड्यासाठी नकाशा मात्र उपलब्ध होतो. हा सगळा अनागोंदी कारभार असून हा आराखडा रद्द झाला पाहिजे.” त्यांनी टीएफसी झोनबाबतही प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या शंकांचे निरसन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले.

विलास रुमडे म्हणाले, “जनतेला हा आराखडा वेळेत न मिळाल्याने आणि त्याची जनजागृती न झाल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आराखडा समजून घेऊन त्यावर हरकती नोंदविण्यासाठी ३० दिवसांची वाढीव मुदत मिळावी.”

अॅड. अजित गोगटे म्हणाले, “आराखड्याबाबत जनतेमध्ये नाराजी आहे, तरीही आपले शहर सुंदर बनविण्यासाठी आणि विकास साध्य करण्यासाठी विकास आराखडा महत्त्वाचा आहे. जनतेने जास्तीत जास्त हरकती नोंदवून हा आराखडा अधिक चांगला होण्यासाठी प्रयत्न करावेत. हीच खरी जनशक्तीची ताकद आहे.”

या सभेला ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, नगरसेवक-नगरसेविका, डॉ. सुनील आठवले, उमेश कुळकर्णी, चंदन मेस्त्री, निशिकांत साटम आदी मान्यवर उपस्थित होते.

सभेत राजा भुजबळ, योगेश चांदोस्कर, चारुदत्त सोमण, दत्ताराम जुवाटकर, प्रदीप कोयंडे, शरद लाड आदींनी सहभाग घेतला. या सभेला सुमारे ५०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. सभास्थळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.