राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव जिल्हास्तरीय स्पर्धेत कुडाळ हायस्कूल प्रथम

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : माध्यमिक शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५ ची जिल्हास्तरीय स्पर्धा नुकतीच कुडाळ येथील मराठा सभागृहात उत्साहात पार पडली. ‘मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयावर आधारित विविध नाटिकांचे दर्जेदार सादरीकरण या स्पर्धेत करण्यात आले.

जिल्ह्यातील आठही तालुक्यांतून अव्वल ठरलेल्या शाळांच्या संघांनी यात सहभाग घेतला. माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सचिव प्रकाश कानूरकर तसेच विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सहभागी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पना नाट्यरूपाने प्रभावीपणे सादर करत विकसित तंत्रज्ञानाचा मानवी जीवनातील उपयोग स्पष्ट केला. शिक्षण विभाग व सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाच्या यशस्वी प्रयत्नातून विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळाले, याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी समाधान व्यक्त केले व सहकार्याची ग्वाही दिली.

स्पर्धेचा निकाल

स्पर्धेत कुडाळ हायस्कूल, कुडाळ ने प्रथम क्रमांक पटकावला.

प्रथम – कुडाळ हायस्कूल, कुडाळ,

द्वितीय – मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी, तर तृतीय: सौ. इदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल, पोईप-विरण, मालवण, याशिवाय, उत्कृष्ट नायक (सचिन परब), उत्कृष्ट नायिका (सावी मुद्राळे), उत्कृष्ट दिग्दर्शक (गुरुप्रसाद शिरसाट) आणि उत्कृष्ट नेपथ्य (दत्ताराम नाईक) यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वामन तर्फे, प्रकाश कानुरकर, संजय वेतुरेकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे विशेष सन्मान करण्यात आला.