सावंतवाडी । प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय स्तरावर सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सावंतवाडीचे सुपूत्र आणि आंतरराष्ट्रीय खोळाडू व पंच, तसेच ८ व्या डिग्रीचे ब्लॅक बेल्ट होल्डर असलेले शिहान सुधीर श्रीकृष्ण वंजारी यांनी नुकताच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आपला विक्रम नोंदवून राज्याचे व देशाचे नाव उंचावले आहे.
कराटे क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाचा आणि अभ्यासाचा हा एक मोठा टप्पा आहे. चेन्नई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लारजेस्ट कराटे डिस्प्ले’ या विक्रमी कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला आणि यशस्वीरित्या हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी चेन्नई येथील S.I.E.V.T कॉलेजच्या मैदानावर ‘वर्ल्ड कराटे मास्टर्स’ या संस्थेतर्फे ‘लारजेस्ट कराटे डिस्प्ले’ हा महाविक्रम नोंदवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात संपूर्ण भारतातून जवळ-जवळ ९५० कराटेपटूंनी सक्रिय सहभाग घेतला होता. या विक्रमाची नोंद घेण्यासाठी आणि सत्यता पडताळण्यासाठी लंडनहून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ची अधिकृत टीम विशेषत्वाने उपस्थित होती. शिहान सुधीर वंजारी यांनी या विक्रमात अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
विक्रमांची हॅट-ट्रिक
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्यापूर्वीही शिहान सुधीर वंजारी यांनी त्यांच्या कराटे कौशल्याच्या बळावर यापूर्वी तीन वेळा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये आपले नाव कोरले आहे. चार वेळा राष्ट्रीय स्तरावर विक्रमांची नोंद असलेल्या सुधीर वंजारी यांच्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एक सर्वोच्च सन्मान ठरला आहे.
या जागतिक विक्रमाबद्दल शिहान सुधीर श्रीकृष्ण वंजारी यांचे सर्व स्तरांतून, विशेषतः कराटे जगतातून व सावंतवाडीवासियांकडून प्रचंड कौतुक केले जात आहे. त्यांच्या या यशाने महाराष्ट्रातील आणि भारतातील कराटेपटूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.












