जनसेवातर्फे शब्दांकुर प्रकाशन व वाचक पुरस्कार सोहळा

रत्नागिरी : जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मीचौक यांच्यावतीने दरवर्षी दिपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात येणार्‍या हस्तलिखित ‘शब्दांकुर-25’चा प्रकाशन सोहळा व जनसेवा ग्रंथालयातर्फे देण्यात येणारा ‘उत्कृष्ट वाचक पुरस्कार’ प्रदान सोहळा मंगळवार दि.14 ऑक्टो. रोजी आयोजित करण्यात आला आहे.

जनसेवा ग्रंथालयातर्फे दरवर्षी दिपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शब्दांकुर हे हस्तलिखित प्रकाशित करत असते. या हस्तलिखित उपक्रमातून नवोदित साहित्यिकांना लेखनासाठी संधी देण्यात येते, तसेच प्राचीन लेखन परंपरेची जपणूक होते. गेली 25 वर्षे जनसेवा ग्रंथालय शब्दांकुर हे हस्तलिखित साकारत आले आहे. यावर्षीच्या हस्तलिखिताचे प्रकाशन मंगळवार दि.14 ऑक्टो.रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.किशोर सुखटणकर यांच्याहस्ते होणार आहे. जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मीचौक येथे हा कार्यक्रम सायं. 4 वा. होणार आहे.

याच कार्यक्रमात जनसेवा ग्रंथालयातर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या उत्कृष्ट वाचक पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. यावर्षीचे उत्कृष्ट वाचक पुरस्कार बालगटातून शारदा अभ्यंकर, व स्पृहा भावे यांना जाहीर झाले असून मोठ्या गटातून श्रीया पटवर्धन, नरेश पाडळकर यांना जाहीर झाले आहेत. या कार्यक्रमाला वाचक, सभासद, साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थिती लावावी, असे आवाहन जनसेवा ग्रंथालयातर्फे करण्यात आले आहे.