सिंधुदुर्गातील विकासकामांसंदर्भात मंत्रालयात पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
महाप्रीतमार्फत सौरऊर्जेवरील प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना
मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रीत) संस्थेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योगांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवणे, तसेच मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारी कोल्ड स्टोरेज यंत्रणा उभारणे या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
सदर प्रकल्प ‘महाप्रीत’च्या माध्यमातून जलद आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
या बैठकीस महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबूडकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.













