तोल जाऊन तारामुंबरी खाडीत पडलेल्या महिलेला चिन्मय खवळे या युवकाकडून जीवदान

देवगड : प्रतिनिधी

तारामुंबरी खाडीत पाण्यात तोल जाऊन बुडत असताना संगीता गोविंद आचरेकर (४५, रा. जामसंडे भटवाडी) या महिलेला तारामुंबरी येथील चिन्मय खवळे या युवकाने पाण्यात उडी मारून वाचविले. ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली.

जामसंडे भटवाडी येथील संगीता आचरेकर या महिला मंगळवारी सकाळी देवगड येथे गेल्या होत्या. देवगडहून तारामुंबरी मार्गे त्या दुपारी खाडीवरील बांधाऱ्यावरून चालत आपल्या घरी भटवाडीकडे जात होत्या. अचानक त्यांचा तोल जाऊन त्या बांधाऱ्यावरून थेट खाडीच्या पाण्यात पडल्या. ही घटना तारामुंबरी येथील पूर्वा तारी यांनी पाहिली आणि त्यांनी आरडाओरड केली.

याचदरम्यान मुंबईत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विरेंद्र खवळे हे त्या ठिकाणाहून जात असताना आरडाओरड ऐकली. त्यांनी तात्काळ सूर्यकांत खवळे यांना फोन करून माहिती दिली.

सूर्यकांत खवळे यांनी तात्काळ चिन्मय खवळे आणि अक्षय खवळे यांना बांधाऱ्याकडे जाण्यास सांगितले. दोघेही तेथे पोहोचले असता एक महिला पाण्यात बुडताना दिसली. त्यावेळी चिन्मय खवळे यांनी कोणतीही तमा न बाळगता पाण्यात उडी मारून पोहत तिच्यापर्यंत पोहोचले आणि तिला बाहेर काढून वाचविले.

चिन्मय खवळे हे गोव्यात स्कूबा डायव्हिंग ट्रेनर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मोठ्या धाडसाने पाण्यात उडी घेऊन एका महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. चिन्मय खवळे हे खवळे महागणपती ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.