भगवान कोकरे महाराज आणि प्रितेश कदम यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे येथील ‘निवासी आध्यात्मिक वारकरी गुरुकुल’ येथे अध्यात्म व किर्तनाचे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन व तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात निवासी आध्यात्मिक वारकरी गुरुकुलचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि अध्यात्म शिकवणाऱ्या प्रितेश प्रभाकर कदम याच्याविरोधात भारतीय दंडसंहिता तसेच पोक्सो अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबतची माहिती खेड पोलीस यांच्याकडून देण्यात आली.
खेड पोलीस स्थानकामध्ये अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मुलगी मागील काही काळापासून गुरुकुलात आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी राहत होती. यावेळी गुरुकुलातील प्रमुख असलेल्या भगवान कोकरे महाराज यांनी अनेकदा तिच्याशी अश्लील व तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. सुरुवातीला ही घटना घडल्यानंतर पीडीत मुलीने गुरुकुलातीलच अध्यात्म शिकवणाऱ्या प्रितेश कदम यांना ही घटना सांगितली असता त्यांनी याबाबत कुठेही काही बोलू नकोस, महाराजांची सामाजिक व राजकीय ओळख असून तुला मारून टाकतील व तुझ्या वडिलांनाहीअडकविण्यात येईल व तुझीही बदनामी घेईल, त्यामुळे गप्प राहण्यास सांगितले, असेही पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
यानंतर पीडितेच्या बाबतीत कोकरे महाराजांकडून वारंवार अशा प्रकारच्या घटना लागल्या. यादरम्यान ही मुलगी तिच्या घरी आली असता हा प्रकार वडिलांना सांगायचा की नाही याबाबत ती रूममध्ये रडत बसली असता याबाबत तिच्या वडिलांनी का रडतेस असे शपथ देऊन विचारले असता तिने घडलेला सारा प्रकार कथन केला. यानंतर कुटुंबीयांनी लगेचच पोलिसांत धाव घेतली आणि सदर मुलीने आपली तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली असून याप्रकरणी संशयितांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.











