मुंबई-गोवा महामार्गावर लाखो रुपयांचा तंबाखू-पानमसाला जप्त; एकाला अटक

गाडीसह जवळपास ८.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी-गणपतीपुळे मार्गावर बेकायदेशीररित्या तंबाखू आणि पानमसालाची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा पानमसाला आणि सुगंधीत तंबाखू तसेच बोलेरो गाडी असा एकूण ८ लाख ३० हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवारी, २१ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

शिवाजी चव्हाणला अटक

या प्रकरणी शिवाजी अनंतराव चव्हाण (वय ५०, रा. फणसोप सडा, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार अमित कदम यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, निवळी-गणपतीपुळे रस्त्यावरील रानवारा हॉटेलजवळून चव्हाण हा त्याच्या बोलेरो पिकअप गाडीतून (एमएच-०८-एपी-४५४५) प्रतिबंधित मालाची वाहतूक करत होता.

पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या गाडीची तपासणी केली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधित केलेला सुगंधीत तंबाखू आणि पानमसाल्याच्या एकूण ४३ गोण्या आढळून आल्या. हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक तेजस्वी पाटील करत आहेत.

कारवाईत सहभागी अधिकारी

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे, पोलीस हवालदार नितीन डोमणे, बाळू पालकर, अमित कदम, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर, गणेश सावंत आणि पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांचा सहभाग होता.