तिकिटासाठी भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्या पायावर लोटांगण घातले — शशिकांत चव्हाणांचा आरोप

खेड (प्रतिनिधी) – गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव यांनी एकेकाळी आमदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या पायावर लोटांगण घातले होते, असा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण यांनी केला आहे.
खेड तालुक्यातील सुसेरी जिल्हा परिषद गटात आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना चव्हाण मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते म्हणाले, “आज भास्कर जाधव रामदास कदम यांच्यावर स्वार्थी असल्याचे आरोप करतात, पण 2004 साली जेव्हा त्यांना आमदारकीचे तिकीट हवे होते, तेव्हा त्यांनी खुद्द रामदास भाईंच्या पायावर लोटांगण घातले होते. मी स्वतः तो प्रसंग पाहिला आहे. त्या वेळी त्यांनी बापूसाहेब खेडेकर यांचे तिकीट कापून स्वतःला संधी मिळावी म्हणून प्रयत्न केले होते.” यावेळी चव्हाण पुढे म्हणाले, “तेव्हा रामदास भाई योग्य वाटले आणि आज तेच स्वार्थी वाटतात, हीच भास्कर जाधव यांची दुटप्पी भूमिका आहे. त्यांनी केवळ स्वार्थासाठी शिवसेना सोडली, आणि आता वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जनता सगळं लक्षात ठेवते.”
शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणाले की, “रामदास कदम हे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी कोकणातील युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या अनेक योजना राबवल्या. काजू उद्योगासाठी स्वतःच्या नावावर घेतलेले कर्ज तेवढ्या प्रामाणिकपणे फेडले. भास्कर जाधव यांनी मात्र आपल्या राजकीय स्वार्थासाठी अनेकांना फसवले.” शेवटी शशिकांत चव्हाण म्हणाले, “भास्कर जाधव यांनी आत्मपरीक्षण करावे. येणाऱ्या निवडणुकीत गुहागर मतदारसंघातील जनता त्यांना योग्य उत्तर देईल. सुसरी गटातील आमचे तीनही उमेदवार पाच हजार मतांच्या फरकाने विजयी होतील, असा मला विश्वास आहे.”