*पतसंस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे येथील शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला कोकण विभागातून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त प्रथम क्रमांकाचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सन 2024–2025 या आर्थिक वर्षात संस्थेने उल्लेखनीय आर्थिक प्रगती करताना खालील मोलाची कामगिरी केली:
ठेवी: ₹85 कोटी
कर्ज वाटप: ₹65 कोटी
गुंतवणूक: ₹30 कोटी
वसूल भागभांडवल: ₹4 कोटी
नफा: ₹1 कोटी
एकूण व्यवसाय: ₹152 कोटी
संस्थेने शासनाच्या सहकार विभागाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत C.D. Ratioc – 69.74%, CRR – 1.50%, SLR – 28.24% आणि CRAR – 13.44% इतक्या उत्कृष्ट वित्तीय सूचकांकांची नोंद केली आहे.
या यशामागे संस्थेचे चेअरमन CA प्रकाश थेराडे, सेक्रेटरी संतोष थेराडे, सर्व संचालक मंडळ, आणि कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम आहेत. दररोज व्यवसाय वाढवण्यासाठी एकसंध प्रयत्न, पारदर्शक कारभार आणि सभासदाभिमुख सेवा हे यशाचे मुख्य घटक ठरले आहेत. संस्थेला सातत्याने “अ” दर्जाचे ऑडिट मिळत असून, पुरस्काराचे श्रेय सर्व कर्मचारी, ठेवीदार आणि सभासद यांचे असल्याचे गौरवोद्गार संस्थेचे सरचिटणीस संतोष थेराडे यांनी काढले. पुरस्कार वितरण समारंभात, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मा. काका कोयटे आणि अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर (सहकारी संस्था, पुणे) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेच्या वतीने संतोष थेराडे, संजय कानल, GM रवींद्र थेराडे, संकेत थेराडे, कौस्तुभ मयेकर, सिद्धार्थ लाड, आणि सल्लागार बाळकृष्ण काष्टे यांनी पुरस्कार स्वीकृत केला. संस्थेचे चेअरमन प्रकाश थेराडे यांनी सांगितले की, सप्टेंबर 2025 अखेर ₹96 कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून, दिवाळीपर्यंत ₹100 कोटींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट आहे. या सन्मानाबद्दल संचालक, कर्मचारी, आणि सर्व सभासदांचे अभिनंदन होत असून, संस्थेचा हा सततचा प्रगतीचा आलेख इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.












