१६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा, एका आरोपीला ५ लाखांचा दंड
राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुक्यात विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची विक्री करणाऱ्यांविरोधात राजापूर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून तब्बल ३४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असलेल्या १६ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव उपविभगिय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे अवैध दारू विकेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
राजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून गोवा बनावटीच्या दारूची विनापरवाना विक्री सुरू होती. सहज उपलब्ध होणारी आणि तुलनेने कमी दरात मिळणारी ही दारू अनेकांच्या व्यसनाधीनतेचे कारण ठरत होती. या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, काहींना आपले प्राणही गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे या स्वस्त दारूच्या सहज उपलब्धतेमुळे तरुण पिढीही मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वर्षभरात 34 जणांवर गुन्हे दाखल
या गंभीर प्रकाराची दखल घेत राजापूर पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री आणि वाहतूक करणाऱयांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. तालुक्यातील विविध भागांमध्ये गुप्त माहितीच्या आधारे धाडी टाकण्यात आल्या. या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्षभरात तब्बल 34 जणांवर गुन्हे दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
16 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव
केवळ गुन्हे दाखल करून न थांबता अशा अवैध व्यवसायात वारंवार सहभागी होणाऱयांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे. त्यानुसार 16 जणांविरोधात संबंधित कायद्यातील कलम 96 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. संबंधित व्यक्तींनी पुन्हा अशा गुह्यांमध्ये सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कठोर आर्थिक दंडात्मक कारवाई होण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कारवाईच्या अनुषंगाने एका आरोपीला शासनाकडे पाच लाख रुपयांची दंडात्मक रक्कम जमा करावी लागल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलिसांनी ही मोहीम प्रभावीपणे राबविली. अवैध दारू विक्री करणाऱयांवर सातत्याने लक्ष ठेवून धडक कारवाया करण्यात आल्या. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रीच्या व्यवसायाला मोठा आळा बसण्यास मदत झाली आहे.
गोवा बनावटीच्या दारूमुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकण्याबरोबरच अनेक कुटुंबांचे सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ्यही बिघडत आहे. त्यामुळे अशा अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेली ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत आहे. राजापूर पोलिसांनी वर्षभरात केलेल्या या धडक कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अवैध दारू विक्रीविरोधातील ही मोहीम यापुढेही अशीच सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
उत्पादन शुल्क विभागाची भूमिका संशयास्पद
दारू बंदीसाठी शासनाचे राज्य उत्पादन शुल्क विभाग हे स्वतंत्र खाते अस्तीत्वात आहे. मात्र राजापूरातच नव्हे तर जिल्हयात या विभागाची दारू कारवाईबाबतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. मोठ मोठया कारवाया केल्याचा केवळ फार्स हा विभाग करत असल्याचा आरोप जनतेतुन होत आहे. या विभागा दारूबंदीसाठी की कुणीही दारू विक्री करा आंम्ही वसुली करू यासाठी अशी या विभागाची कार्यपध्दती असल्याचा आरोप जनतेतुन होत आहे.












