कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील मांडकुली – केरवडे भोईवाडी ते तेर्सेबाबंर्डे- मळावाडी नदी पात्रावरील नवीन ब्रीज उर्वरित कामासाठी निधी व येथील रस्त्याच्या प्रश्नाकडे मांडकुली – केरवडे भोईवाडी ग्रामस्थांनी आमदार नीलेश राणे यांचे लक्ष वेधताच त्यांनी बुधवारी त्या त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. त्या ग्रामस्थांशी संवाद साधत समस्या जाणून घेतली.त्यानंतर ब्रिजचे काम व रस्ताबाबत तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मुबई गोवा महामार्गानजीक तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी दरम्यान करली नदीपात्रावर नवीन ब्रीजचे काम जवळपास पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षे झाली. ब्रीजसाठी ठराविक निधीची आवश्यकता आहे. तसेच महामार्गापासून या ब्रीजपर्यंत येणारा रस्ता अपूर्ण आहे. त्यामुळे मांडकुली – केरवडे भोईवाडी ग्रामस्थांनी चार दिवसापूर्वी आमदार श्री राणे यांची भेट घेत रखडलेल्या या प्रश्नाकडे त्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. केरवडे उपसरपंच अर्जुन परब,सामाजिक कार्यकर्ते प्रसाद धोंड, प्रशांत धोंड, परशुराम नार्वेकर, बाबाजी भोई, शैलेंद्र न्हावेलकर, मोहन भोई यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
मांडकुली, केरवडे, तुळसुली, मुळदे या गावांना जोडणाऱ्या तेर्सेबांबर्डे – मळावाडी ते माडकुली भोईवाडी दरम्यान कर्ली नदीवर मोठ्या ब्रिजची अनेक वर्षापासून मागणी होत होती. शासन दरबारी केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे या मार्गावर मंजूर झालेला ब्रीज पूर्ण होऊन तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु तेर्सेबांबर्डे राष्ट्रीय महामार्ग ते कर्ली नदीपर्यंत जाणाऱ्या अंदाजे १५० मीटर लांबीच्या रस्त्याच्या समस्येमुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची दळणवळणाचा प्रश्न गहन बनला आहे तरी या रस्त्याची समस्या आणि ब्रीजचे शिल्लक कामासाठी आवश्यक निधी मिळाल्यास दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी आपल्या स्तरावरुन प्रयत्न व्हावेत,अशी मागणी श्री राणे यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या निवेदनानंतर आमदार श्री राणे यांनी आज तेथील ब्रीज आणि महामार्ग ते ब्रीज परिसराची पाहणी केली. श्री राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद धोंड यांनी श्री राणे यांना रखडलेल्या कामाची माहिती दिली.
दरम्यान, या भागातील रस्ता व पुलाच्या कामांबाबत तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश आमदार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याना दिले.तसेच स्थानिकांची सोय व्हावी म्हणून या ब्रीजसाठी कोटीचा निधी खर्च झाला आहे. काही गोष्टी मुळे येथून वाहतूक सुरू होण्यास विलंब झाला आहे. मात्र,
स्थानिकांच्या सोयीसाठी हा रस्ता लवकरात – लवकर सुकर व सुरक्षित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहतील,अशी ग्वाही श्री राणे यांनी ग्रामस्थांना दिली.जि. प.माजी अध्यक्ष संजय पडते, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रुख आनंद शिरवलकर, दीपक नारकर, तुळसुली सरपंच मिलिंद नाईक,युवासेनेचे स्वरूप वाळके, तेर्सेबाबर्डे सरपंच रामचंद्र परब , केरवडे सरपंच श्रिया ठाकूर,उपसरपंच अर्जुन परब , मांडकुली सरपंच गौतमी कासकर , प्रशांत धोंड,मोहन भोई व ग्रामस्थ उपस्थित होते.












