राजापुरात अल्पवयीत शाळकरी दुचाकीस्वारांना पोलीसांचा दणका

२७ शाळकरी अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कारवाई
कारवाईनंतर पुन्हा या अल्पवयीन दुचाकीस्वारांकडून नियमांचे उलंघन सुरूच
रानतळे भागातील इंग्रजी माध्यम प्रशाळेतील मुलांचा सर्वाधिक समावेश

राजापूर (प्रतिनिधी):  राजापुरात अल्पवयीन शाळकरी दुचाकीस्वारांना राजापूर पोलिसांनी चांगलाच इंगा दाखविला आहे. मंगळवारी अशा तब्बल २७ शाळकरी विद्यार्थ्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यापैकी नऊ प्रकरणांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांना दुचाकी देणाऱ्या पालकांचे धाबे दणाणले आहेत.
मात्र या कारवाई नंतर पुन्हा काही शाळकरी अल्पवयीन युवकांनी गाडया फिरवण्यास सुरूवात केली असून पोलीसांनी या अशा प्रकारांना कायमचा आळा घालावा अशी मागणी होत आहे. तर अनेक बडया पालकांना आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास देण्यास मोठेपणा वाटत असून यातुन गंभीर अपघात झाल्यास पुढील परिणामांना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थी विनापरवाना वाहने आणत असल्याबद्दल आणि ती भरघाव, बेदरकारपणे चालवून इतरांना त्रास देत तसेच जीवाशी खेळत असल्याबद्दल राजापूर पोलीस ठाण्यात महाविद्यालयाकडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार राजापूर पोलिसांनी कठोर भूमिका घेत मंगळवारी धडक मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान राजापूर पोलीस ठाणे येथील वाहतूक अंमलदार दीपक करजवकर आणि नितीन फाळके यांनी तब्बल २७विद्यार्थ्यांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. तसेच नऊ विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ५ हजार रूपयांचा मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. विनापरवाना वाहन चालवणाऱ्या मुलांसाठी आता पालकांनाही जबाबदार धरले जात असल्याचे पालकांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना वाहने चालवण्यास देत असताना त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना आहे की नाही, याची खात्री करावी. त्याचप्रमाणे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी आणि महाविद्यालयाच्या आवारात अत्यंत शिस्तबद्ध व व्यवस्थितरित्या वाहने चालवावीत, जेणेकरून इतरांना कोणताही त्रास होणार नाही किंवा कोणाचा जीव धोक्यात येणार नाही, याची समजही पालकांनी आपल्या मुलांना द्यावी. भविष्यात अशा घटना पुन्हा घडल्यास पोलीस प्रशासन अधिक कठोर कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन राजापूर पोलीस ठाण्याने केले आहे.
रानतळे येथील इंग्रजी माध्यम प्रवशाळेतील अनेक अल्पवयीन युवकांकडून नियमांची पायमल्ली
शहरातील रानतळे भागात असलेल्या इंग्रजी माध्यम प्रवशाळेत अशा प्रकारे मोठया प्रमाणावर अल्पवयीन शाळकरी मुले गाडया घेऊन जात आहेत. पालकही अगदी बिनधास्तपणे आपल्या मुलांना गाडया देत आहेत. काही पालक तर आपल्या मुलांच्या या गैरप्रकारांना पाठबळ देत आहेत. गतवर्षी अशाच प्रकारे याच प्रशाळेतील एका दहावीतील अल्पवयीन युवकाचा दुचाकी घसरून गंभीर अपघात झाला होता. यात त्याच्या पाठीमागे बसलेली युवतीही जखमी झाली होती. तो विद्यार्थी गतवर्षी दहावीच्या परिक्षेलाही मुकला होता. एवढे प्रकार होऊनही शाळा प्रशासनाकडूनही गांभीर्याने लक्ष दिले जात नाही याबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.