सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून वृद्धाला १५ लाखांचा गंडा

गुहागरमधील घटना; अटकेची भीती दाखवून पैसे उकळले

गुहागर | प्रतिनिधी :
शहरातील कीर्तनवाडी कालवा रोड येथे राहणाऱ्या एका ६८ वर्षीय वृद्धाला आपण बंगळूर सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून तब्बल १५ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. अटकेची भीती दाखवून तसेच चौकशीच्या नावाखाली वेळोवेळी धमकावत आरोपीने वृद्धाला स्वतःच्या खात्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडले. विजय सहदेव गडदे (६८, निवृत्त माझगाव डॉक, सध्या रा. मुलुंड) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात ७ नोव्हेंबर रोजी संदीप दिवान, सदाकत खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय गडदे गणेशोत्सवासाठी गावी आले असताना २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांना व्हॉट्सअॅप कॉल आला. आपण बंगळूर येथील सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत सदाकत खान या आरोपीने त्यांच्या नावाने कॅनरा बँकेच्या मुलुंड शाखेत खाते उघडले असून, त्याद्वारे तीन कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचे सांगितले. या व्यवहारातील दहा टक्के म्हणजेच ३० लाख रुपये खान याने गडदे यांना दिल्याचा आरोपही करण्यात आला. गडदे यांच्या खात्यात केवळ २० हजार रुपये असल्याचे सांगून आरोपीने फोन कट केला. त्यानंतर आरोपी संदीप दिवान याने गडदे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्याची प्रत पाठवली. मात्र, काही वेळातच ती प्रत डिलीट केली. पुढील तपासासाठी दिलेल्या खात्यावर पैसे जमा करावे लागतील, अन्यथा अटक केली जाईल, अशी धमकी देत त्यांना मानसिक दबावाखाली ठेवले.

दरम्यान, बामणोली येथील एका वृद्धाची २४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच गुहागरमध्ये आणखी एका ज्येष्ठ नागरिकाला १५ लाखांचा गंडा घालण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपीकडून वारंवार कॉल
१ ऑक्टोबर रोजी गडदे मुलुंड येथे असताना आरोपीने त्यांना वारंवार फोन आणि व्हॉट्सअॅप कॉल केले. चौकशीसाठी २५ लाख रुपये जमा करावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल करून आरोपीने बँक खात्याचा क्रमांक दिला. त्यानुसार गडदे यांनी एसबीआयच्या धनादेशाद्वारे १५ लाख रुपये मुलुंड येथील एसबीआय शाखेत जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गडदे यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.