चिपळूण (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, आंबडस येथे भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ आणि “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक वसंत यादव आणि ज्येष्ठ शिक्षक महेश कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करून विज्ञान, शिस्त आणि राष्ट्रसेवेची मूल्ये अंगीकारण्याचा संकल्प केला. आपल्या मनोगतात महेश कुलकर्णी यांनी सांगितले की, “डॉ. कलाम यांनी विज्ञान क्षेत्रात केलेले योगदान भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांनी क्षेपणास्त्र निर्मितीत मोलाचा वाटा उचलून देशाची प्रगती साधली. त्यांचे जीवन आणि विचार प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहेत. वाचनाची सवय जोपासल्यास विचार परिपक्व होतात, म्हणूनच आजचा दिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो.” याच निमित्ताने विद्यालयात इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता ७ वीतील समृद्धी शशिकांत महाडिक या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. मुख्याध्यापक वसंत यादव यांच्या हस्ते समृद्धीला ‘अग्निपंख’ हे पुस्तक बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या राजेंद्र बांबाडे यांनी सर्वांचे आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुसूदन मर्गज यांनी केले.











