‘आम्ही आपल्या सोबत आहोत’ : पोलिसांचा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीचा स्नेहभेट

तालुक्यात ४ ठिकाणी स्नेहमेळाव्यांचे उत्साहात आयोजन

सावंतवाडी । प्रतिनिधी :दिवाळी पर्वावर सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘दिवाळी स्नेहभेटी’चा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. ‘आम्ही आपल्यासोबत आहोत’ ही आश्वासक भावना वृद्धिंगत करण्याच्या उदात्त उद्देशाने सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण चार ठिकाणी या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यांचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला, पोलीस ठाण्याच्या प्रांगणात, तसेच आंबोली, सातार्डा आणि मळेवाड या चार प्रमुख ठिकाणी या मेळाव्यांनी एक सामाजिक सोहळ्याचे स्वरूप धारण केले. पोलिसांच्या या आस्थेच्या आणि स्नेहाच्या आवाहनाला ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस ठाण्यात ४०, आंबोली येथे ३५, मळेवाड येथे ४०, तर सातार्डा येथे २५ अशा मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या मेळाव्यात सहभागी झाले आणि त्यांनी पोलिसांच्या या सामाजिक बांधिलकीला दाद दिली.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी ‘व्हाट्स ॲप चॅनेल समुद्र संदेश’ आणि ‘संवादातून आधार’ यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या महत्त्वपूर्ण सेवांची माहिती दिली. विशेषतः सध्या वाढत्या फसवणुकीचे प्रकार आणि सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या धोक्यांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले, ज्यामुळे ज्येष्ठांना सुरक्षिततेचा कानमंत्र मिळाला.

केवळ शुभेच्छा देणे हा नव्हे, तर ‘पोलीस दल तुमच्या प्रत्येक गरजेस आणि सुरक्षिततेस सदैव तत्पर आहे,’ याची खात्री देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. नरक चतुर्दशीच्या मंगलमय पूर्वसंध्येला पोलिसांनी दिलेल्या या हृदयस्पर्शी दिवाळी शुभेच्छांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे चेहरे समाधानाने उजळून निघाले. त्यांनी पोलिसांच्या या ‘आपलेपणा’च्या भूमिकेबद्दल मनस्वी आनंद व्यक्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या उदात्त संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली, हा स्तुत्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.