दाजीपूर अभयारण्य सफारी अखेर सुरू!

गोकुळ’चे संचालक अभिजीत तायशेटे यांच्या मागणीला यश

पर्यटकांच्या हस्ते नारळ वाढवून जंगल सफरीची सूर वात

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

राधानगरी: महाराष्ट्रात दिवाळीच्या सुट्टीत पर्यटन जोमात सुरू असतांना , कोल्हापूर जिल्ह्यातील रानगव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर (राधानगरी) अभयारण्य सफारीसाठी बंद असल्यामुळे निर्माण झालेली तीव्र नाराजी अखेर दूर झाली आहे. गोकुळ’चे संचालक अभिजीत तायशेटे आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या मागणीला यश आले असून, आज शुक्रवार, दि.२४ ऑक्टोंबर पासून अभयारण्यातील जंगल सफारी पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाले होते. मात्र, दाजीपूर अभयारण्य बंद असल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि जीप चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर गोकुळ’चे संचालक अभिजीत तायशेटे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, स्थानिक व्यावसायिक व जीप धारकांसह वन्यजीव विभागाचा निषेध केला होता. राज्यातील इतर पर्यटनस्थळे पूर्ण क्षमतेने सुरू असतांना , कोल्हापूरच्या पर्यटनाची ‘लाईफलाईन’ असलेले दाजीपूर अभयारण्य बंद ठेवणे अन्यायकारक असल्याचे तायशेटे यांनी म्हटले होते. त्यांनी वन विभागाने जंगल सफारी तात्काळ सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

अभिजीत तायशेटे यांच्या नेतृत्वाखालील या मागणीची दखल घेण्यात आली आणि आज शुक्रवार पासून अभयारण्य सफारीसाठी खुले झाले.पर्यटकांच्या हस्ते नारळ वाढवून जंगल सफरीची सूरवात करण्यात आली.जंगल सफारी सुरू झाल्याने स्थानिक व्यापारी, जीप चालक आणि पर्यटन क्षेत्रातील इतर घटकांनी वन्यजीव विभागाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांची निराशा टळली असून, स्थानिकांच्या रोजगाराला मोठा हातभार लागला आहे.