मुंबई / प्रतिनिधी :मुंबई येथे सुरु असलेल्या मालवणी जत्रोत्सवात वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळाने चंड भैरवी माता हे पौराणिक नाटक सादर करीत मायबाप रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. सुमारे 32 वर्षानंतर आरोलकर नाट्य मंडळाने मुंबईत यशस्वी पुनरागमन करत आपली नाट्यकला रसिकांसमोर सादर केली.
आरवली येथील आरोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ हे मुळ नऊ पारंपरिक मंडळापैकी एक मंडळ असून गेली 800 वर्ष दहा पिढ्यांच्या वारसा जपत ही लोककला जिवंत ठेवण्याचे कार्य करत आहे. या कलेचे वारसदार म्हणून ही परंपरा पुढे नेण्याचे कार्य संचालक भाऊ आरोलकर करत आहेत. 1983 ते 1993 अशी तब्बल 10 वर्ष शासनाचे विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मुंबई असे दौरे करून कोकणातील ही लोककला घाटमाथ्यापर्यंत पोचविण्याचे कार्य या मंडळाने केले आहे.
0 यंदा मुंबईच्या मालवणी जत्रोत्सव 2025 मध्ये काल वाघदेवी नगर दहिसरच्या रंगमंचावर आरोलकर मंडळाने आपल्या बहारदार सादरीकरणाने रसिकांना खिळवून ठेवले. दशावतार कलाक्षेत्रात आपल्या बावन्नकशी बहारदार अभिनयातून राजपात्र साकारणारे पप्पू चव्हाण यांनी आपली देहबोली, उत्कृष्ट भाषशैलीच्या जोरावर राजपात्राला उत्तम न्याय दिला. प्रताप गावडे यांनी वल्लभ नगरीचा राजा उत्तम सादर केला. पार्वतीची भूमिका साकारणारे संतोष सामंत यांनी भावपूर्ण अभिनय सादर करत भक्तांच्या रक्षणासाठी माता सदैव तत्पर असते हे दाखवून दिले. बाळा हळदणकर यांनी आपल्या उत्कृष्ट वेशभूषेतून क्रूर भैरव साकारत आपल्या खणखणीत आवाजात रंगमंच दणाणून सोडला. आनंद गावकर यांनी आपल्या गोड आवाजात नारद सादर करून नाटकाची शोभा वाढवली. पप्पू मेस्त्री याने आपल्या सौंदर्याच्या जोरावर डोंबरी कन्या साकारून रसिकांची मने जिंकली. जेष्ठ कलाकार बाबू राणेनी उत्तम असुर साकारला तर नारायण कुंभार यांनी आपल्या कॉमेडी अभिनयाने डोंबारी सादर करत प्रेक्षकांनी हसवत ठेवले. सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिका प्राण ओतून सादर केल्यानेच उत्तम दर्जेदार नाटक रसिकांना पाहता आले.
दशावतारी नाटकाचा आत्मा म्हणजे संगीत होय. हार्मोनियम वादक भोळा सावंत यांनी आपल्या पहाडी आवाजाने नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. पखवाजवादक किसन नेमळेकर व तालरक्षक भरत लाड यांनी आपल्या मंत्रमुग्ध वादनाने रसिकांना डोलवत ठेवले.
32 वर्षांपूर्वी दिग्गज कलाकारांच्या संचात कंपनीने मुंबईत जी नाटके सादर केली होती त्याच जोशात त्याच ताकदीने काल नाटक सादर केले गेले. हीच आमची कमाई आहे असे भाऊ आरोलकर म्हणाले. रसिकांची कौतुकाची थाप हेच आमचे सर्वोच्च बक्षीस असल्याचे मंडळाचे संचालक सौरभ पाटकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले.












