पोलीस कारवाई नंतरही राजापुरात अल्पवयीन दुचाकीस्वार व त्यांच्या पालकांची मुजोरी सुरूच

अल्पवयीन दुचाकीस्वारांकडून राजरोसपणे शहरात दुचाकी फिरवत कायदा धाब्यावर
पोलीसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर शहरातील शाळा महाविद्यालये व अन्य भागातील अल्पवयीन दुचाकीस्वारांविरोधात पोलीसांनी सुरू केलेल्या धडक कारवाईत आत्तापर्यंत सुमारे २० ते २५ अल्पवयीन दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करून दंड वसुल करण्यात आला आहे. मात्र अशा प्रकारे पोलीसांकडून कारवाई व दंड होत असतानाही अनेक पालक आपल्या मुलांना बेधडकपणे दुचाकी चालविण्यास देत असल्याने पालकांचा बेजबाबदारपणा पुढे आला आहे. कारवाईनंतरही ही अल्पवयीन मुले व त्यांचे पालक यांची मुजोरी सुरूच असून राजरोसपणे हे अल्पवयीन दुचाकीस्वार शहरात दुचाकी फिरवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आता या प्रकरणी केवळ दंडात्मक नाही तर पालक व पाल्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
राजापूरात अल्पवयीन दुचाकीस्वारांनी गेले काही महिने उच्छांद मांडला आहे. अनेक बडया बापांची मुले बेधकडपणे शहरात दुचाकी चालवत आहेत. शहरातील रानतळे येथील इंग्रजी माध्यम प्रशाळेत तर अशा प्रकारे दुचाकी घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या ही ५० ते ६० इतकी आहे. शाळा प्रशासनाने याबाबत सांगूनही हे विद्यार्थी आणि त्यांचे पालकही ऐकत नाहीत अशी परिस्थिती आहे.
या प्रकरणी नुकतीच एक विशेष मोहिम राबवून राजापूर पोलीसांनी २० ते २५ जणांवर कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार रूपये दंडही आकारला. मात्र त्यानंतर हे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झालेले नाही. उलट ही मुले बेधडकपणे शहरात दुचाकी चालवत आहेत. काही जण तर स्वता अल्पवयीन असताना दुसऱ्याला गाडी शिकवत आहेत. तर काही जण तीन तीन सीट घेऊन फिरत आहेत.
अशा प्रकारे पोलीसांनी कारवाई करूनही या अल्पवयीत दुचाकीस्वारांची राजापुरात मुजोरी सुरूच असून पालकही त्यांना पाठीशी घालत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशा प्रकारे या अल्पवयीन मुलांना पालक गाडया देतातच कशा असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी पोलीसांनी कठोर भूमिका घ्यावी व अशा मुजोर अल्पवयीन दुचाकीस्वार आणि त्यांचे मुजोर पालक यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व शहरातील या बेशिस्तीला आवर घालावा अशी मागणी होत आहे.
—————————————————————————————-