वैभववाडी येथे ३१ऑक्टोबर रोजी दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिर

सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे : वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरोटे अर्जून यांचे आवाहन

वैभववाडी प्रतिनिधी : वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले आहे.

विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्याकडे UDID ( Unique Disability ID card) कार्ड नाही असे अजूनही वैभववाडी तालुक्यात दिव्यांग लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कार्ड काढणे हे दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना शारीरिक व आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. यात दिव्यांग बांधवांची ससेहोलपट होऊ शकते.
अशा बांधवांची सोय तालुक्यात शिबिर घेऊन करण्यात येत आहे. लाभार्थ्यांचे UDID कार्ड पडताळणी तालुकास्तरावर शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिर होणार आहे. तसेच सदर शिबिरामध्ये तालुक्यातील सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांची पात्र, अपात्र बाबत तपासणी देखील करून घेण्यात येणार आहे.

सदर शिबिरा पूर्वी ज्या लाभार्थ्याकडे UDID कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर होणे आवश्यक आहे. तरी या शिबिराचा वैभववाडी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरोटे अर्जुन यांनी केले आहे.