अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतील बैठकीत कोतवली ग्रामस्थांचा इशारा
चिपळूण (प्रतिनिधी) : लोटे औद्योगिक वसाहतीतून सुटणाऱ्या सांडपाण्यामुळे खाडी किनारी असलेल्या कोतवली गावात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याप्रकरणी कोतवली ग्रामस्थ आक्रमक झाले असून स्वच्छ पाणीपुरवठ्यासह ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सोमवारी सायंकाळी लोटे येथील एमआयडीसीच्या औद्योगिक भवनमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दिला.
दूषित पाणी संदर्भात सोमवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एमआयडीसीचे कुलकर्णी, अधिकारी हळदणकर, सीईटीपीचे भूषण शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते. कोतवली सरपंच अक्षता तांबे, सदस्य मंगेश तांबे, संगीता धापसे, सुनील सावर्डेकर, जाफर परकर, केतन पेवेकर, रुपेश पेवेकर, अंकुश पेवेकर, रुपेश जुवळे, नरेश जाधव, सचिन तांबे, राजेंद्र तांबे, प्रथमेश धापसे, प्रल्हाद धापसे, सुनील जाधव, सत्यवान जुवळे, सचिन जुवळे, वसंत जुवळे, रुपेश जुवळे, विनोद आंब्रे आदी ग्रामस्थांसमवेत बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या. यामध्ये कोतवली गावाला तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, गेल्या २०-२५ वर्षांपासून दूषित पाण्यामुळे शेती व फळबागांचे झालेले नुकसान भरून द्यावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्यावे, विद्यार्थ्यांना उद्योगांकडून शैक्षणिक दत्तक योजना राबवावी, तसेच स्थानिकांना रोजगार द्यावा या मागण्यांबरोबरच शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला नाही किंवा सांडपाणी थेट सोडण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
कोतवली येथे एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईपलाईन फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले. याबाबत ग्रामस्थांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. आश्वासन नव्हे, कृती हवी ग्रामस्थांनी केलेल्या या मागण्यांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतं तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. येत्या पंधरा दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणखी एक बैठक घेऊन या समस्यांवर ठोस निर्णय घेण्याचेही त्यांनी सांगितले. तथापि, ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत ‘आश्वासन नव्हे, कृती हवी’ असे स्पष्टपणे सांगत, मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर रस्त्यावर उतरूना तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.











