जि प कळंबनी बुद्रुक शाळा येथील कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात केले प्रतिपादन
चिपळूण ( वार्ताहर) : ग्रामीण भागात राहणाऱ्या तळागाळातील लोकांना कायदेविषयक ज्ञान प्राप्त व्हावे. त्यांच्या ज्ञानात भर पडावी आणि त्यांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत, तरच ते सजग नागरिक बनतील. आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करताना त्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या आणि कायदेच्या बाबतीत निर्माण होणारे पेच प्रसंग यासंदर्भात अशा लोकांना माहिती मिळावी, यासाठीच कायदेविषयक मार्गदर्शन अतिशय मोलाचे आहे. नागरिकांना कायद्याची जाणीव करून देताना त्यांना सजग बनवण्यासाठी व आपल्या हक्क आणि कर्तव्य संदर्भात जागृतता निर्माण करण्यासाठी कायदेविषयक ज्ञान हे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सिद्धयोग लॉ कॉलेज खेडचे प्राध्यापक ऍड .दिलीप चव्हाण यांनी केले.
खेड तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय शाळा कळंबनी बुद्रुक नंबर १ या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक अनिल आंजरलेकर, व गावचे सरपंच भगवान साळुंके यांच्या माध्यमातून कायदेविषयक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिद्धयोग लॉ कॉलेज खेड येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला कळंबनी गावचे सरपंच भगवान साळुंके, उपसरपंच श्री देवघरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामचंद्र येसरे, पोलीस पाटील नरसिंह सुतार, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गावडे, संतोष कदम, दत्ताराम येरापले, आशा सेविका भारती जाधव, अंगणवाडी सेविका आणि शिक्षक वृंद असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुढे या कार्यक्रमात प्रा. ॲड चव्हाण यांनी सांगितले की, स्पर्धेच्या युगात कायद्याच्या काही बाजू समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. नेहमीचे जीवन जगताना अनेक वेळा कायद्याच्या चौकटीतून आपल्याला जावे लागते. अशावेळी मात्र आपल्याला कायद्याचे ज्ञान नसेल तर आपली फसगत होते आणि हीच फसगत होऊ नये यासाठीच सिद्धयोग लॉ कॉलेजने हा उपक्रम सुरू केलेला आहे . दर शनिवारी सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये मोफत कायदेविषयक सल्ला दिला जातो. नागरिकांना कायद्याच्या बाबतीत सजग बनवण्यासाठी हा उपक्रम कॉलेजच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजने सुरू केला आहे, असे त्यांनी सांगतले.
याच कायदेविषयक शिबिरामध्ये कॉलेजच्या प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत उपस्थित मान्यवराना मार्गदर्शन केले. यामध्ये अशोक कांबळे या विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत हा विषय घेत त्याच्यावरती कायदेविषयक गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थिनी सायली जांभळे हिने ग्राहक संरक्षण कायदा या संदर्भात माहिती दिली. ऋतुजा निमदे हिने महिला विषयक कायदे आणि समस्यांचे निराकरण करताना सांगितले की, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, त्यानंतर हुंडाबळी आणि विनयभंग अशा अनेक गोष्टींना स्पर्श करत तिने उत्तम प्रकारे महिलांच्या समस्यांवरती भाष्य केले. त्यानंतर स्नेहल शिरकर हिने पोक्सो कायदा नेमका काय आहे या संदर्भातली माहिती सांगितली. लोक अदालत बाबत लीना डाके यांनी उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रांमध्ये आदर्श शाळा कळंबनी बुद्रुक येथील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सिद्धयोग लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वर्गावरती जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न उत्तम प्रकारे केला. इयत्ता पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांनी सुद्धा न घाबरता किंवा संकोच न करता चांगला प्रतिसाद दिला. यावेळी सर्व शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले. त्यानंतर कायद्याविषयक मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमासाठी कळंबनी शाळा बुद्रुक येथील मुख्याध्यापक अनिल आंजरलेकर अनंत भागणे, सौ. दीक्षित तांबे आणि सौ. शमिका भुवड या सर्व शिक्षकांनी उत्तम सहकार्य केले.
कार्यक्रमात सरपंच भगवान साळुंके यांनी सर्व लॉ कॉलेज मधील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी दिलेली कायद्याची माहिती नक्कीच ग्रामस्थांना उपयुक्त ठरेल, असे सांगितले. अशाच एक मोठा कार्यक्रम पुन्हा घेऊन लोकांमध्ये जागृती करू असे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संतोष कुळे यांनी केले मानले.












