भगवान परशुरामाच्या कृपेने देशाच्या सत्तेतील अनेक पदे आपल्याला मिळाली- खा. नारायण राणे

*भगवान परशुराम देवस्थानचे घेतले सपत्नीक दर्शन*

चिपळूण (प्रतिनिधी):-भगवान परशुरामाच्या कृपेने देशाच्या सत्तेतील अनेक पदे आपल्याला मिळाली. राज्याचा मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता यासह १४ विभागांची मंत्रीपदे भूषविली. विधानसभा, विधानपरिषद, राज्यसभा आता लोकसभेच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी परशुराम येथील भगवान परशुराम देवस्थानाचे दर्शन घेतल्यानंतर सत्कार कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितितांसमोर व्यक्त केली.

मंगळवार व बुधवारी चिपळूण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांच्यासह सौ. निलम राणे यांनी परशुराम येथील भगवान परशुराम देवस्थानाचे दर्शन घेतले. यावेळी परशुराम देवस्थानतर्फे त्यांचे भगवान श्री परशुरामाची प्रतिमा देऊन परशुराम देवस्थानचे अध्यक्ष ऍड. जीवन रेळेकर, विश्वस्त प्रशांत पटवर्धन, अभय सहस्त्रबुद्धे, सौ. गौरी रेळेकर, अरविंद भागवत, देवस्थानचे व्यवस्थापक शंकर कानडे यांनी स्वागत केले.

यावेळी खा. नारायण राणे म्हणाले की, भगवान परशुरामाने माझ्यावर कृपा केली आणि देशाच्या सत्तेतील अनेक पदे मला मिळाली. आपण परशुरामाचे दिलेले पुस्तक वाचून आत्मसात करू. आपण आत्मसात करणारा कार्यकर्ता आहोत, असे स्पष्ट केले. आपण जी निवेदने दिली आहेत. त्याचा स्वतः पाठपुरावा करेन. तुमचा आपल्यावरील विश्वास ढळू देणार नाही, अशी ग्वाही खा. राणे यांनी यावेळी दिली.

यावेळी भाजप नेते प्रशांत यादव, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, माजी नगरसेवक परिमल भोसले, अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप भिसे, भाजपा युवा मोर्चा चिपळूण शहराध्यक्ष शुभम पिसे, प्रफुल्ल पिसे, राकेश घोरपडे आदी उपस्थित होते.