श्रमदानातून उभारले जलसंधारणाचे बंधारे

 जिल्हा बँकेचा ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कणकवली शाखा, कणकवली शहर शाखा आणि विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा बँकेच्या कणकवली शाखेच्या कार्यक्षेत्रातील हुंबरणे व बिडवाडी या गावांमध्ये श्रमदानातून जलसंधारणाचे बंधारे उभारण्यात आले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला बळ देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देसाई यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानांतर्गत श्रमदानातून बंधारे उभारण्याचे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला. जलसंधारणाच्या माध्यमातून भूजलपातळी वाढविण्यास आणि पावसाचे पाणी गावातच मुरविण्यास या उपक्रमाची मोठी मदत होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमात शाखा व्यवस्थापक श्री. गावकर, श्री. लोबो, विकास अधिकारी श्री. गवाणकर तसेच जिल्हा बँकेच्या सर्व शाखा कर्मचाऱ्यांनी श्रमदानात सक्रिय सहभाग नोंदविला. ग्रामस्थ आणि बँक कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सहभागातून साकारलेल्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.

*(फोटो-27)जिल्हा बँकेच्या कणकवली शाखेच्यावतीने श्रमदानातून जलसंधारणाचे बंधारे उभारण्यात आले.