देवगड / प्रतिनिधी
पडवणे येथील अजय मारुती जाधव (४७) व त्यांच्या कुटुंबाला तसेच तेथील प्रमोद दशरथ जाधव, रामकृष्ण आबा जाधव, वसंत बाळकृष्ण जाधव यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जाधव समाजातील मंदिरामध्ये साजरे होणारे सण व उत्सवांमध्ये प्रतिबंध केला. तसेच त्यांच्या घरी साजरा होणारा गणेश चतुर्थी सण व इतर सणांवर बहिष्कार घालून जाधव समाजापासून व समाजाद्वारे साजरे होणारे सण उत्सवांपासून अलिप्त ठेवण्यात आले. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार तेथील महेश नागेश जाधव (५५, रा. पडवणे) याच्यासह एकूण १२ संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ जानेवारी २०२४ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवणे येथील महेश नागेश जाधव (५५), प्रशांत मोहन जाधव (५२), कृष्णा बळीराम जाधव (४७), जितेश जयप्रकाश जाधव (३५), सत्यवान नागेश जाधव (४८), गणेश मंगेश जाधव (२९), सुशांत सरदार जाधव (३२), उमेश दत्तात्रय जाधव (४७), विजय बाळकृष्ण जाधव (६०, रा. मुंबई), बाजीराव मनोहर जाधव (५४), दिनेश गजानन जाधव (६२, रा. मुंबई), सुरेश रामचंद्र जाधव (४२, रा. मुंबई) या संशयितांनी तेथील फिर्यादी अजय मारुती जाधव यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना तसेच प्रमोद जाधव, रामकृष्ण जाधव, वसंत जाधव यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जाधव समाजातील श्री देव फटोबा मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर व कुलस्वामिनी मंदिरामध्ये साजरे होणारे सण व उत्सवांमध्ये प्रतिबंध केला. तसेच त्यांच्या घरी साजरा होणारा गणेश चतुर्थी सण व इतर सणांवर बहिष्कार घातला. जाधव समाजापासून व समाजाद्वारे साजरे होणारे सण उत्सवांपासून त्यांना अलिप्त ठेवले. याप्रकरणी अजय मारुती जाधव यांनी देवगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार सर्व संशयितांविरुद्ध सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम २०१६ चे कलम ५, ६, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.











