स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खासदार नारायण राणे यांचा शब्द अंतिम : ना. उदय सामंत

 

सावंतवाडीत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खासदार नारायण राणे यांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असणार आहे. सध्या शिवसेनेत त्यांच्यासारखच नेतृत्व निलेश राणे करत आहेत. आताच पालकमंत्र्यांसह एकत्र विमानाने आलो. महायुतीसाठी समन्वयक समिती आग्रही आहे. वाईट घडू नये म्हणून एकनाथ शिंदे देखील पुढाकार घेत आहे‌. मात्र, महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी आपली पाहिजे. मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम असलं पाहिजे, त्या दृष्टीने तयारीला लागा, असे आवाहन शिवसेनेचे संपर्क मंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

सावंतवाडी येथील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, महिला जिल्हा आघाडीप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, हर्षद डेरे, सुनिल डुबळे, अनारोजीन लोबो, भारती मोरे, शहर प्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, प्रेमानंद देसाई, परिक्षीत मांजरेकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. सामंत पुढे म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची मोठी ताकद आमदार दीपक केसरकर यांनी उभी केली आहे. तर दुसरीकडे खासदार नारायण राणेंच्या मागे उभा राहिलेला जिल्हा आम्ही बघितला. तीच माणसं आज निलेश राणेंच्यामागे उभी आहेत. मात्र, महायुती झाल्यास सन्मान राखला गेला पाहिजे. तसेच आपली तयारीही असली पाहिजे. त्यामुळे आपल्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असणार अशी भुमिका घेऊन कामाला लागा, असे आवाहन शिवसेना संपर्क मंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केल.

माजी मंत्री आमदार दीपक केसरकर म्हणाले, युतीत मिठाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही. मात्र, स्थानिक पातळीवर वेगळी विधान येतात. तोडायच असेल तर आमच्याकडून तुटलं असं नको. मैत्रीचा धर्म आम्ही जाणतो. मात्र, महायुती झाली तर ती वेळेत झाली पाहिजे‌. नारायण राणे आमचे खासदार आहेत. त्यांनाही मान दिला गेला पाहिजे. महायुती न झाल्यास उगाच दुसऱ्याला संधी मिळता नये याचीही काळजी घेतली पाहिजे, असे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.

तर यावेळी कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे म्हणाले, सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत आपली ताकद आहे. त्यामुळे थांबायची वेळ गेली. हीच ती वेळ आहे, तुम्ही तयारीला लागा. तिन पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. आपल्या ताकदीला कोणी नाकारू शकत नाही. आमचे नेते युतीचा निर्णय घेतील. मात्र, मित्रपक्षाची विधान बघता दोन दिवसांपूर्वी आम्ही स्वबळाचा नारा दिला. मात्र, त्याचा फायदा विरोधकांना होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळे आपापल्या मतदारसंघात कामाला लागा आम्ही सोबत आहोत अशी ग्वाही आ. निलेश राणे यांनी दिली.