रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील नाणीज येथील वृध्दाचा मृतदेह घराजवळीलच रेवाळेवाडी ते गुरववाडी जाणाऱ्या तिठ्याच्या खाली नाल्याच्या पाईपमध्ये मिळून आला. ही बाब मंगळवार 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वा.सुमारास निदर्शनास आली.
विजय तानू कांबळे (60,रा.नाणीज बौध्दवाडी,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. विजय कांबळे हे नाणीज येथील घरी एकटेच रहात होते. त्यांना अति प्रमाणात दारुचे व्यसन असल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुले हे मुंबईला रहातात. शुक्रवार 24 ऑक्टोबर रोजी त्यांची पत्नी विशाखा कांबळे हिने पती विजय कांबळे यांना फोन केला. परंतू त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर त्यांचा फोन बंद लागत असल्याने त्यांच्या मुलीने नाणीज येथे शेजारी राहणारे दिपक गुरव यांना फोन करुन वडिलांची विचारपूस केली असता दिपक गुरव यांनी विजय कांबळे घरात दिसत नसून घराला कुलूप असल्याचे त्यांच्या मुलीला सांगितले.
दरम्यान, विजय कांबळेंची पत्नी विशाखाने भाचा स्वप्निल साळवी (रा.देवळे) याला घरी जाउन पाहण्यास सांगितले असता त्यानेही गावात सर्वत्र विजय कांबळेंचा शोध घेतला परंतू ते मिळून आले नाहीत. अखेर विशाखा कांबळे यांनी नाणीजला येउन इतर नातेवाईकांसह पतीचा शोध घेतला असता ते घराच्या जवळ असणाऱ्या रेवाळेवाडी व गुरववाडी जाणाऱ्या तिठ्यात रस्त्याच्या खाली नाल्याच्या पाईपमध्ये मिळून आले. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









