लांजा पोलिसांतर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘एकता दौड’ उत्साहात पार!

लांजा (प्रतिनिधी) लांजा पोलिस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दौड कार्यक्रम आज शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने ‘राष्ट्रीय एकता दिवस’ (Rashtriya Ekta Diwas) निमित्त “एकता दौड” (Run for Unity) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सकाळी लांजा पोलीस ठाण्यात मोठ्या उत्साहात पार पडला.देशाच्या एकता, अखंडता आणि सुरक्षेच्या भावनेला बळकटी देण्यासाठी तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या देशासाठी केलेल्या अद्वितीय कार्याचे स्मरण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‘एकता दौड’ उपक्रमाचा शुभारंभ लांजा पोलीस ठाण्यातून करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने पाच किलोमीटर वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या दौडीत श्री. कदम यांच्यासह पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, उपनिरीक्षक अमोद सरंगळे, पोलीस कर्मचारी, नायब तहसीलदार लांजा, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस दलाचे सर्व अधिकारी पोलीस अंमलदार, पोलीस पाटील, होमगार्ड , लांजा सीनियर कॉलेजचे प्रा. राहुल मराठे व एन एस एस चे विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
ही दौड लांजा पोलीस ठाणे येथून सुरू होऊन लांजा कोर्लेफाटा ते पुन्हा पोलीस ठाण्यात परत आली. कार्यक्रमादरम्यान सुरक्षेची काटेकोर व्यवस्था ठेवण्यात आली होती. लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.या ‘एकता दौड’मुळे खेड परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.