देवरूख महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय खो-खो स्पर्धेत पटकावले उपविजेतेपद

देवरूख (प्रतिनिधी):

मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन खो-खो स्पर्धेतील पुरुष गटात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाने उपविजेतेपद प्राप्त करून गतवर्षीच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. या स्पर्धा श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालय, लांजा येथे नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात देवरुख महाविद्यालयाने फिनोलेक्स अभियांत्रिक महाविद्यालय, रत्नागिरीचा एक डाव आणि नऊ गुणांनी पराभव केला, तर उपांत्य सामन्यात जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग यांच्यावर एक डाव आणि चार गुणांनी मात केली.

महाविद्यालयाच्या संघात प्रतीक बालदे(कर्णधार), प्रथमेश कुळ्ये, साहिल आग्रे, ऋषिकेश सुवारे, सुजल पड्ये, तेजस झेपले, सुशांत माने, हर्ष उबारे, प्रवीण गमरे, पार्थ भुरवणे, चैतन्य रामाणे, ओमकार बारगुडे, परेश सनगले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विभागीय स्पर्धेसाठी संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. देवेश जोग यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेतील सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या साहिल आग्रे, प्रथमेश कुळ्ये व प्रतीक बालदे यांची कोकण विभागीय संघाच्या शिबिरासाठी निवड झाली आहे. उपविजेत्या संघातील सर्व खेळाडूंचे तसेच कोकण विभागीय संघाच्या शिबिरात निवड झालेल्या खेळाडूंचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, जिमखाना विभाग प्रमुख सब लेफ्टनंट उदय भाट्ये आणि विभागातील प्राध्यापक सदस्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.