आदर्श शिक्षण समितीच्या वतीने विध्यार्थी गुणगौरव समारंभ!

मसुरे | झुंजार पेडणेकर :   आदर्श शिक्षण समितीच्या कार्यालयाचे काम येत्या पाच ते सहा महिन्यांत सुरू होईल असे मत आदर्श शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यानी व्यक्त केले. ते आदर्श शिक्षण समितीच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व विद्यार्थी गुणगौरव समारंभाच्या अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना बोलत होते . आदर्श शिक्षण समिती देवगड – मुंबई च्या वतीने विद्यार्थांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ अध्यक्ष सुरेश पवार यांचे अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.

आदर्श शिक्षण समिती देवगड (रजि.) याच्यावतीने देवगड तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वह्या व क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तकांचे वितरण दरवर्षी केले जाते त्याच प्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कमेची शिष्यवृत्ती आणि पारितोषिक दिली जातात. त्याप्रमाणे संस्थेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुंबई येथील श्रीमती शिवराजवती ओंकारनाथ आर्यसमाज सभागृह लोअर परेल-मुंबई येथे आदर्श शिक्षण समितीचे अध्यक्ष सुरेश पवार यांचे अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अनंत दाभोळकर, सरचिटणीस भारत पाटणकर, सहचिटणिस गोपीनाथ नेवरेकर , कोषाध्यक्ष राजाराम पवार,गजानन पवार, प्रकट महाराष्ट्र युट्यूब चँनलचे पत्रकार दत्ताराम दळवी, कार्यकारिणी सदस्य प्रकाश पवार, विजय पाटणकर, आण्णा शिरकर,भगवान पाटणकर, अंतर्गत हिशेब तपासणीस सुभाष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपाध्यक्ष अनंत दाभोळकर यानी प्रास्ताविकातून सांगितले कि संस्था उत्तरोत्तर प्रगती करत असल्याने संस्थेचे कौतुक करत आहे, तसेच यासंस्थेसाठी योगदान दिलेल्या सन्माननीय देणगीदार , हितचिंतक यांचेहि मनापासून कौतुक करतो.यावे पत्रकार दत्ताराम दळवी , सरचिटणीस भारत पाटणकर, कोषाध्यक्ष राजाराम पवार आदीनी मार्गदर्शन केले. यावेळी पहिली पासून ते महाविद्यालया मध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनंत दाभोळकर यानी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार सरचिटणीस भारत पाटणकर यानी मानले.