मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम- मिलिंद कदम

चिपळूण (वार्ताहर) : वाढत्या खड्ड्यांमुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेचे विघ्न अद्यापही कायम राहिल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कदम यांनी व्यक्त केली आहे. दरवर्षीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री महोदयांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत असते. गणेशोत्सवापूर्वी राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त करण्याची सूचना मंत्री लोकप्रतिनिधीनी बांधकाम विभागाला वेळोवेळी केली होती. राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम केलेल्या ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाने या सूचनेची दखल न घेतल्याने खड्ड्यांचे विघ्न कायम राहिल्याचा आरोप मिलिंद कदम यांनी केला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे या २१ किमी लांबीच्या रस्त्याच्या अपघात प्रवण क्षेत्राचा समावेश आहे. तळेकांटे ते आरवली, बावनदी ते वाकेड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलद गतीने व्हावे. संगमेश्वर लांजा रत्नागिरी तालुक्याचा विकासाला यामुळे खिळ बसल्याचे मत मिलिंद कदम यांनी व्यक्त केले आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी या अपघात प्रवण क्षेत्रात महामार्गावर विक्रमी खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाला पाठीशी घातल्याने विविध कारणास्तव रुग्ण तसेच चाकरमान्यांसह गणेश भक्तांना यंदा अनेक संकटाचा सामना करावा लागल्याचे कदम यांनी सांगितले आजही अपघातांची भीती कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग अपघात मुक्त करावा, अशी मागणी श्री. कदम यांनी केली आहे.
दरवर्षी गणेशोत्सवपूर्वी महिनाभर आधी मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येते. महामार्गाची दुरुस्ती देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत यंदाही आदेश सूचनांची औपचारिकता पूर्ण झाली. मात्र, महामार्गासह अंतर्गत भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी का पाठ फिरवली आहे? असा सवाल शेवटी मिलिंद कदम यांनी केला आहे.