ठाणे कला गौरव पुरस्काराने दादा राणे-कोनसकर यांचा सन्मान!

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कोनशी गावचे सुपुत्र ज्येष्ठ दशावतारी कलावंत दादा राणे-कोनसकर यांना नुकताच ठाणे कला गौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दशावतार क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

​कोनशी गावचे रहिवासी असलेले मास्टर दादा कोनसकर यांचा दशावतार क्षेत्रातील प्रवास खरोखरच अद्वितीय आहे. त्यांच्या घराण्याला दशावताराची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा कै. बाबुराव राणे, वडील कै. बाबा राणे, काका कै. दाजी राणे यांच्यानंतर त्यांचे बंधू उदय कोनसकर हे सध्या दशावतारातील लोकप्रिय कलाकार आहेत. तसेच, या कोनसकर घराण्याच्या चौथ्या पिढीचे आणि दादांचे चिरंजीव राम कोनसकर हे देखील भूमिका आणि नवीन नाट्यकृती संकल्पना व लेखनातून प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. गोवा, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे यासह अनेक ठिकाणी या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग आहे.
​ट्रिकसीनचे निर्माते दादा कोनसकर:
​आजवर दादा कोनसकर यांचा खलनायक पाहण्यासाठी नाट्यप्रयोगाच्या वेळी मोठी गर्दी होत असे. सध्या दशावतार क्षेत्रात नवनवीन ट्रिकसीनचे नाट्यप्रयोग येत आहेत, आणि या ट्रिकसीनचे खरे निर्माते दादा राणे कोनसकर आहेत. अनेक दर्जेदार ट्रिकसीन युक्त नाट्यपुष्पे त्यांनी रसिकांसाठी आणली. ‘श्री स्वामी समर्थ’ हे ट्रिकसीन असलेले नाटक विशेष गाजले आणि प्रचंड पसंतीस उतरले. याव्यतिरिक्त, त्यांची पौराणिक आणि काल्पनिक नाटकेही लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. अनेक वर्षे कोनसकर घराणे दशावतार क्षेत्राला योगदान देत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेक ठिकाणी त्यांचा गौरव झाला असून, विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

​उपमुख्यमंत्र्यांच्या शिफारसीनुसार पुरस्कार वितरण:
​२०२५ चा मानाचा समजला जाणारा ठाणे कला गौरव पुरस्कार सावरकर नगर, ठाणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार वितरित करण्यात आला. ठाणे महोत्सवाचे सर्वेसर्वा दिलीप बारटक्के यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार दादा राणे कोनसकर यांना प्रदान करण्यात आला.

​सन्मानाची रक्कम आपत्ती मदत निधीत जमा!
​दशावतार क्षेत्रातील अनेक वर्षांची यशस्वी कारकीर्द लक्षात घेऊन, सावरकर नगर, ठाणे येथील मंडळाने दादा राणे कोनसकर यांचा रोख रक्कम २५,००० रुपये मानधन देऊन गौरव केला. मात्र, दादांनी ही रक्कम न स्वीकारता, पुनश्च मंडळाचे सर्वेसर्वा दिलीप बारटक्के यांच्याकडे सुपूर्द केली. ही रक्कम आपत्ती मदत निधी कक्षात जमा करण्यात आली आहे.

​मदतनिधीचा उद्देश:
​या रकमेचा उपयोग एखाद्या दशावतार कलाकारावर संकट आले असता, त्याला आर्थिक मदत म्हणून देण्याचे दादांनी ठरविले आहे. मोठ्या मनाचा कलाकारच असा निर्णय घेऊ शकतो, असे मत व्यक्त होत आहे. दादा कोनसकर यांच्या या निर्णयामुळे सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. याप्रसंगी दादा कोनसकर यांनी गेली अनेक वर्षे सर्व मंडळांची मुंबईत राहण्याची व्यवस्था करत असलेल्या ठाणे महोत्सवाचे सर्वेसर्वा दिलीप बारटक्के यांचे आभार मानले.