सावंतवाडी नगरपरिषदेचा २०२६-२७ चा १४९ कोटींचा अर्थसंकल्प सादर

शहराच्या कायापालटासाठी ‘मोती तलाव’ सुशोभीकरण आणि ‘भुयारी गटार’ योजनेवर विशेष भर

शहराच्या पायाभूत सुविधा आणि पर्यटनाला नवे आयाम देण्याचा प्रयत्न 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी नगरपरिषदेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे १४९ कोटी ९७ लाख २७ हजार ८७३ ( एकूण जमा) रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ९३ कोटी ५० लाख १४ हजार रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात प्रामुख्याने भुयारी गटार योजना, ऐतिहासिक मोती तलावाचे सुशोभीकरण, जिमखाना मैदानाची सुधारणा आणि २४ तास पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पीय आराखडा नुकताच सादर करण्यात आला असून, यामध्ये शहराच्या पायाभूत सुविधा आणि पर्यटनाला नवे आयाम देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमानुसार सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात

प्रारंभिक शिल्लक ७६ कोटी ६१ लाख २९ हजार ८७६ असून महसूली जमा २० कोटी ९९ लाख ६२ हजार तर भांडवली जमा ५२ कोटी ३६ लाख ३६ हजार मिळून एकूण १४९ कोटी ९७ लाख २७ हजार ८७३ रुपये जमा तर महसूली खर्च २५ कोटी ६९ लाख १४ हजार व भांडवली खर्च ६७ कोटी ८१ लाख मिळून एकूण खर्च ९३ कोटी ५० लाख १४ हजार दर्शविण्यात आले असून एकूण शिल्लक ५६ कोटी ४७ लाख १३ हजार ८७३ अखेरची शिल्लक दर्शविण्यात आली आहे. तर आगामी वर्षासाठी सुमारे ९३ कोटी ५० लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

*पायाभूत सुविधा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प*

नगरपरिषदेने यावर्षी काही धाडसी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे नियोजन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी शहराची अस्मिता असलेल्या मोती तलावाचे सुशोभीकरण करणे आणि तेथे पर्यटनासाठी बोटिंग क्लब सुरू करण्याचा मानस आहे. शहरातील सांडपाण्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ८० कोटी रुपये खर्चाची भुयारी गटार योजना हाती घेण्यात आली असून, २०२६-२७ या वर्षासाठी त्यामध्ये २० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.

तसेच, शहरवासीयांना २४ तास शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पाळणेकोंड धरणाची साठवण क्षमता वाढवणे आणि जुनी पाणीपुरवठा योजना सुधारण्यासाठी १७.५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याशिवाय जिमखाना मैदान आणि क्रीडा संकुलाचा दर्जा उंचावण्यासाठीही विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

*उत्पन्न वाढीसाठी ‘कॅपिटल व्हॅल्यू’वर आधारित कर आकारणी*

नगरपरिषदेची आर्थिक बाजू भक्कम करण्यासाठी मालमत्ता कराच्या वसुलीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आता मालमत्ता कराची आकारणी ‘भांडवली मूल्यावर’ (Capital Value) करण्याचा विचार असून, ३.२५ कोटी रुपयांची १०० टक्के कर वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

यासोबतच शहरातील भाजी मार्केट, मच्छी मार्केट आणि पथविक्रेत्यांच्या नोंदणीतून ४३ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारती, गाळे आणि मोकळ्या जागांच्या भाड्यापोटी सुमारे ७० ते ८० लाख । रुपयांची वसुली करण्याचे लक्ष्य आहे.

*सामाजिक कल्याण आणि नागरी सुविधा*

नगरपरिषदेने सामाजिक बांधिलकी जपत महिला व बालविकास, दुर्बल घटक आणि दिव्यांग कल्याण कार्यक्रमांसाठी उत्पन्नाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवला आहे. प्रत्येक विभागासाठी सुमारे १२.५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांची देखभाल आणि खड्डे बुजवण्यासाठी ५० लाख रुपये, तर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च केले जातील.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यासाठी ४० लाखांच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शासकीय अनुदानातून विकासकामे

नगरपरिषदेला विविध शासकीय योजनांतर्गत मोठ्या निधीची अपेक्षा आहे.

यामध्ये नगरोत्थान योजनेतून ५ कोटी, अग्निशमन सेवा बळकटीकरणासाठी १.५ कोटी आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनांतर्गत दीड कोटी रुपये मिळतील, असा अंदाज आहे. प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

आर्थिक शिस्त आणि काटकसर

केवळ खर्चच नव्हे, तर नगरपरिषदेने खर्चात कपात करण्यासाठी ‘आर्थिक शिस्त’ पाळण्याचे धोरण स्वीकारले आहे. मनुष्यबळावरील खर्च, वाहनांचे इंधन आणि देखभालीचा खर्च कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. तलावाकाठी चित्रीकरणासाठी शुल्क निश्चित करणे यांसारख्या उपाययोजनांतून नगरपरिषदेचे स्वतःचे उत्पन्न वाढवण्याकडे कल असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत आहे.

एकूणच, सावंतवाडीचा हा अर्थसंकल्प शहराला आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज करणारा आणि आर्थिक शिस्त लावणारा ठरेल, अशी चिन्हे दिसत आहेत.