दापोली Update: पावसामुळे रस्ता खचल्याने झाला पांगरी दापोली एस.टी. बसचा अपघात

दापोली (विशेष प्रतिनिधी) —
कोकणात सुरू असलेल्या पावसाने पुन्हा एकदा आपला कहर दाखवला आहे. दापोली तालुक्यातील पांगारी-दापोली मार्गावर 3 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एस.टी. बसचा भीषण अपघात झाला. पावसामुळे रस्ता खचल्याने बसचा तोल गेला आणि ती थेट पलटी झाली. या अपघातात चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ही बस पांगारीहून दापोलीकडे परतत असताना पांगारी हद्दीतील नवाशेत फार्महाऊसजवळ हा अपघात घडला. समोरून एक दुचाकी वाहन येत असल्याने चालकाने बसला थोडी साईड दिली, मात्र पावसामुळे ओलसर झालेल्या रस्त्याची साईड पट्टी अचानक खचली. त्यामुळे बसचा तोल गेला आणि ती हळूहळू कलंडत कडेला पलटी झाली.
अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड उडाली. मात्र स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी तत्काळ घटनास्थळी धावले आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. सामाजिक कार्यकर्ते इलियाज बर्डे यांनी पांगारी ग्रामस्थांच्या मदतीने चालक, वाहक आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक प्रशासनानेही जागेवर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. पावसामुळे रस्त्यांच्या साइडपट्ट्या खचत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी स्थानिकांच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.