सावंतवाडी । प्रतिनिधी :
आ. दीपक केसरकर यांनी शहराच्या विकासासाठी गेल्या वर्षभरात १६ कोटी रुपये एवढा निधी आणला आहे. त्यापैकी काही कामे मार्गी लागली असून काही कामांना मंजुरीही मिळाली आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब यांनी दिली. संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख ॲड. नीता सावंत कविटकर, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, अजय गोंदावळे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले आ. केसरकर यांनी गेल्या वर्षभरात शहरातील योगा सेंटरसाठी अडीच कोटी, म्युझियम साठी दीड कोटी, मटण मार्केट साठी तीन कोटी, मोती तलाव नजीक गार्डन विकसित करण्यासाठी दीड कोटी, शहरातील रस्ते व गटार सुशोभीकरण्यासाठी तीन कोटी, शहरातील मोती तलावाच्या फुटपाथच्या कामासाठी ६० लाख, ओपन प्लेसच्या विकासासाठी ५० लाख, समाज मंदिर चाळ दुरुस्तीसाठी ४० लाख आदी साडेसोळा कोटीचा निधी आणला आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले, येत्या १३ तारीखपर्यंत आम्ही नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करणार आहोत. आमची त्याबाबत तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही स्वतंत्र निवडणुकीला तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.













