कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हा रथ पांडुरंगाच्या चरणी अर्पण
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सोपवली होती जबाबदारी
कुडाळ | विलास कुडाळकर
पंढरपूरचा पांडुरंग आपली सेवा भक्ताकडून कोणत्या प्रकारे करून घेईल हे सांगता येत नाही आणि याची प्रचिती म्हणून कुडाळ येथील श्री केळबाई इंडस्ट्रीजचे मालक सिद्धेश नाईक यांच्याकडून पांडुरंगाने पालखी सोहळा रथ घडवून घेतला आहे. हा रथ पूर्णपणे सागवानी वृक्षाचा असून रथ पूर्णत्वास जाण्यासाठी दोन वर्ष उलटली आज (बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी) कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हा रथ पांडुरंग चरणी अर्पण करण्यात आला.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कुडाळ केळबाईवाडी येथील सिद्धेश नाईक यांना श्री पांडुरंग पालखी सोहळा रथ घडविण्याचे काम दिले. सिद्धेश नाईक यांचा एमआयडीसी मध्ये श्री केळबाई इंडस्ट्रीज म्हणून उद्योग आहे. २०१९ मध्ये या समितीने ऋग्वेद या वेद ग्रंथाच्या लाकडीपेटीचे काम सिद्धेश नाईक यांच्याजवळ सोपवले होते ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे केल्यानंतर पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याच्या रथाचे कामाची जबाबदारी त्यांनी १ जानेवारी २०२३ रोजी दिली. ही जबाबदारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सिद्धेश नाईक यांच्या श्री केळबाई इंडस्ट्रीज जवळ दिली. त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या एकादशी किंवा द्वादशीच्या मुहूर्तावर या रथाचे काम केले जात होते. तब्बल दोन वर्ष रथ घडविण्यामागे गेले. या रथासाठी सव्वाशे ते दीडशे वर्षांपूर्वीचे सागवानी वृक्ष वापरण्यात आले आहे.
आज (बुधवार ५ नोव्हेंबर रोजी) कार्तिक शुद्ध पौर्णिेला श्रीं चरणी अर्पण करण्यात आले.
हा रथ पंढरपूर ते आळंदी परत आळंदी ते पंढरपूर ७०० किमी कार्तिक शुद्ध पौर्णिमा ते मार्गशीर्ष शुद्ध ९, श्रेयाळ षष्ठी नगर प्रदक्षिणेला गौर विसर्जन मिरवणूक करता, श्री गणपती आणण्यासाठी व विसर्जन मिरवणुकीसाठी, नगर प्रदक्षिणा करता, दसरा सीमोलंघनासाठी, दसरा पालखी मिरवणुकीसाठी, आषाढी पौर्णिमा पालखी मिरवणुकीसाठी, कार्तिक पौर्णिमा पालखी मिरवणुकीसाठी, श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळा मिरवणूक नगर प्रदक्षिणा मार्गे माघ शुद्ध ५ पंचमी, मार्गशीर्ष अमावस्यावेळी श्री विष्णुपद मंदिर ते नगर प्रदक्षिणा मार्गे विठ्ठल मंदिरात या कार्यक्रमासाठी वापरला जाणार आहे व दर्शनासाठी मंदिर परिसरात ठेवला जाणार आहे. सदर रथाची लांबी १५ फूट, रुंदी ६.५ फूट, उंची १५ फूट अशी असून रथाचा प्रवास बैलजोडीने होणार आहे. संपूर्ण रथाचे वजन २ टनच्या आतमध्ये आहे. विशेष म्हणजे हा विठ्ठल मंदिर समितीचा मंदिरासाठीचा पहिलाच रथ आहे. संपूर्ण कारागिरी ही हाताने केलेली असून रथाच्या समोरच्या खांबांवर जयविजय ची मूर्ती आहे. रथाच्या वरील बाजूस गरुड हनुमंत आहेत. ८ खांबी रथ असून ३ कळस रथाला आहेत. या रथाचे कुशल कारागिर श्री. सिद्धेश नाईक, श्री. शामसुंदर मेस्त्री त्यांचे सहका-यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे व सिंधुदुर्गातील कुशल तरुण उद्योजक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.














