खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय राहील : प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

सावंतवाडी । प्रतिनिधी :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही निवडणूक पूर्ण ताकतीने लढत असते. त्यासाठी ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या त्या ठिकाणी कोणीही उमेदवार उभा असला तरीही ‘ कमळ ‘ चिन्ह हाच आपला उमेदवार आहे असे समजून काम करा. आपले नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात हा जिल्हा नेहमीच भाजपमय राहिला आहे व तो नेहमीच भाजपमय राहील, असा विश्वास कोकणचे सुपुत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते तर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर व राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगांवकर, संघटन मंत्री शैलेंद्र दळवी, माजी आमदार ॲड. अजित गोगटे, प्रमोद जठार, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, युवा नेते विशाल परब, शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा बँक संचालक रविंद्र मडगांवकर, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, सौ. वेदिका परब, ॲड. संजू शिरोडकर, केतन आजगांवकर, अमित परब आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी देखील उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्वबळाचा नारा दिला. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रदेशच्या पावलावर पाऊल टाकून काम करत आहे. अलीकडेच मुंबईत प्रदेशच्या भव्य कार्यालयाचे भूमिपूजन झाल्यानंतर आज सावंतवाडीत तालुकास्तरीय जनसंपर्क कार्यालयाचे होत असलेले उद्घाटन हे राज्यासाठी प्रेरणादायी आहे. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करीत असताना माझे प्रत्येक तालुक्यावर लक्ष असते व सावंतवाडी हा तर माझा स्वतःचा तालुका असल्याने अध्यक्ष म्हणून सर्वसामान्यांच्या हितासाठी जीजी मदत करता येईल त्यासाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.

ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्याला व देशाला फार मोठे नेते दिले. माजी केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, संसदपटू बॅ. नाथ पै तसेच मधू दंडवते यांच्यासारखी नेतृत्व या जिल्ह्याने उभी केली. आज सिंधुदुर्गचा सुपुत्र असलेले रवींद्र चव्हाण भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे त्यांना बळ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला शतप्रतिषद यश द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय टॅलेंट असलेली युवा पिढी आहे. या युवा पिढीला योग्य मार्गाने नेण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी काम करीत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे स्थानिक भागाच्या विकासासाठी आगामी निवडणुकांमध्ये सर्वच ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी देखील आपल्या भाषणातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल परब यांनी तर सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.