खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील श्री काळकाई इंटरप्राईजेस समोर गुरुवारी दुपारी झालेल्या अपघातात एका मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे. दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईवरून खेडकडे येणारी MH 47 BB 8247 ही कार आणि त्याच दिशेने जाणारी मोटरसायकल क्रमांक MH 08 BD 3102 यांची पाठीमागून धडक झाली. धडकेचा जोर एवढा होता की मोटरसायकलस्वार रस्त्यावर दूर फेकला गेला.
या घटनेची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली सतत अपघातग्रस्तांच्या मदतीस तत्पर असलेली श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य संस्थान नानिजधाम यांची रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला प्राथमिक उपचार देत उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे हलविण्यात आले. या अपघातात जखमी झालेल्याचे नाव शंकर भीमराव भोसले (वय ४०, रा. तिसंगी) असे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण नेमके काय याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी असल्याने काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.












